कार्तिक यात्रा पुर्व नियोजनाबाबत आढावा बैठक
पंढरपूर ,दि.02/11/2021/नागेश आदापुरे :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारकरी व नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने कार्तिकी यात्रेबाबत शासनाकडून निर्णय घेण्यात येईल.तथापि कार्तिक यात्रा भरविण्याबाबत शासनाकडून सूचना प्राप्त झाल्यास प्रशासनाने पुर्व तयारी म्हणून आवश्यक नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी सर्व विभागाने समन्वय राखून नियोजन करावे अशा सूचना प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या.
कार्तिक वारी पुर्व नियोजनाबाबत नवीन भक्त निवास पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम,तहसिलदार सुशिल बेल्हेकर, स्वप्निल रावडे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे,मुख्याधिकारी अरविंद माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, नायब तहसिलदार किशोर बडवे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.गिराम, पोलीस निरिक्षक, अरुण पवार, धनंजय जाधव यांच्यासह सर्व संबधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी गुरव म्हणाले,कोरोनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करुन सर्व संबधित विभागाने आपणास दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडण्यासाठी नियोजन करावे. नगरपालिकेने स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवठा, प्रदक्षिणा मार्गावरील आवश्यक ठिकाणी रस्ते दुरुस्ती, शहरात वेळोवळी फवारणी करावी, चंद्रभागा वाळवंटात पुरेसा प्रकाश राहिल याबाबत नियोजन करावे,धोकादायक इमारतींवर ठळक सूचना फलक लावावेत, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. मंदीर समितीने व नगरपालिकेने प्रदक्षिणा मार्ग, नदीपात्रात आवश्यक ठिकाणी बॅरकेंटींग करावे व अग्निशामक यंत्रणा कार्यरत ठेवावी .
कार्तिकी यात्रा कालावधीत मंदीर समितीने जादाचे पत्राशेड उभारावेत,दर्शन रांगेत ठिकठिकाणी सूचना फलक लावावेत. भाविकांना स्वच्छ पिण्याच्या व्यवस्था करावी. मंदीर समितीने शासकीय पुजेला उपस्थित राहणाऱ्या अधिकारी , कर्मचारी तसेच संबधितांची आरोग्य तपासणी करुन घ्यावी. आरोग्य विभागाने शासकीय निवास स्थान व श्री विठ्ठल-रक्मिणी मंदीर येथे तज्ञ डॉक्टरांसह वैद्यकीय पथकाची नेमणूक करावी. तसेच फिरते वैद्यकीय पथक, ऑक्सिजन, रक्तपुरवठा तसेच मुबलक औषधसाठा उपलब्ध राहील याबाबत नियोजन करावे अशा सूचनाही प्रांताधिकारी गुरव यांनी दिल्या.
पोलीस प्रशासनाने वारी कालावधीत सुरक्षततेच्या दृष्टीने योग्य नियोजन करावे, महावितरणने यात्रा कालावधीत सुरक्षित व अखंडीत वीज पुरवठा राहील यांची दक्षता घ्यावी.अन्न व औषध विभागाने प्रसाद विक्री केंद्र,हॉटेल्स यांची वेळावेळी तपासणी करावी अशा सूचनाही प्रांताधिकारी गुरव यांनी दिल्या.
यावेळी बैठकीत राज्य परिवहन महामंडळ, रेल्वे विभाग,उपप्रादेशिक परिवहन, राज्य उत्पादन शुल्क आदी विभागांचा आढावा घेण्यात आला.
बैठकीनंतर पत्राशेड,दर्शन रांग,६५ एकर, विठ्ठलमंदीर व मंदीर परिसर आदी ठिकाणची पाहणी प्रांताधिकारी यांनी केली. यावेळी संबधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचनाही त्यांनी दिल्या.