Jayant Patil: भाजपवर हल्ला करताना जयंत पाटलांचं मोठं विधान; ‘पुन्हा निवडणूक घेतली तर…’


हायलाइट्स:

  • अटक, धाडसत्रांवरून महाविकास आघाडी आक्रमक.
  • जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांवर केला पलटवार.
  • निवडणूक झाली तर भाजपला फक्त ४० जागा मिळतील.

पुणे: महाविकास आघाडी सरकारमधील काहीजण जात्यात आहेत, तर काही जण सुपात आहेत. अजित पवार यांच्या मालकीची बाराशे कोटींची प्रॉपर्टी सील करण्यात आली आहे. आता तरी उद्धव ठाकरे यांनी अशा सहकाऱ्यांना पाठीशी घालणे थांबवावे आणि मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावे’, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले असताना त्याचा खरपूस समाचार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेतला आहे. ते पुणे येथे पत्रकारांशी बोलत होते. ( Jayant Patil On Anil Deshmukh Arrest )

वाचा: ठाकरे सरकारला मोठा धक्का; अनिल देशमुख यांच्या अटकेआधी नेमकं काय घडलं?

देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा धुव्वा उडवत काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी मोठा विजय मिळवला आहे. त्या निकालाचा दाखला देत जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर पलटवार केला. ‘देगलूरमध्ये आज निकाल लागला. तिथे महाविकास आघाडीच्या उमेदवारापुढे भाजपची कशी धूळधाण उडाली हे सगळेच पाहत आहेत. त्यामुळे निवडणुकांना आम्ही घाबरत नसून पुन्हा निवडणूक घेतली तर राज्यात भाजपचे १०५ आमदार आहेत ती संख्या ४० वर येईल’, असा सणसणीत टोला जयंत पाटील यांनी लगावला. चंद्रकांत पाटील यांचं विधान पाहता त्यांना सत्ता मिळवण्याची घाई झाली आहे. त्यासाठी सगळी धडपड चालली आहे. त्यातूनच धाडी आणि अटकसत्र चालवलं आहे. पण हे काही आता नवीन राहिलेलं नाही, असे सांगत भाजपने भानावर यावं आणि समर्थ व स्वच्छ विरोधी पक्ष म्हणून काम करावं, असं आवाहन पाटील यांनी केलं.

वाचा: ऐन दिवाळीत CM ठाकरे यांचे महत्त्वाचे निर्देश; ‘कोविड अद्याप गेला नसून…’

भाजपला टोकाचा विरोध करून राष्ट्रवादी सत्तेत आहे, हे भाजप नेत्यांना बोचत आहे. तो राग त्यांच्या मनात आहे आणि म्हणूनच सूडाचे राजकारण ते करत आहेत. अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारा अधिकारी देश सोडून पळून गेला आहे. पैशांची देवाणघेवाण झाल्याचा कोणताही पुरावा नाही. तरीही त्यांना अटक केली जात असेल तर हा बदला घेतला असेच म्हणावे लागेल, असे पाटील यांनी सांगितले. अजित पवार यांच्या मालमत्ता जप्त केल्याची ओरड केली जात आहे. मात्र, त्या मालमत्ता त्यांच्या आहेत की नाहीत याचीही खातरजमा केली जात नाही. काहीही सिद्ध होत नसताना केवळ बदनामीसाठी हे सगळं भाजप करत आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

जनतेचा स्वच्छ कौल महाविकास आघाडीलाच

देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर विजयी झाले आहेत. भाजपाने कितीही फोडाफोडीचे राजकारण केले तरी जनतेचा कौल हा महाविकास आघाडीलाच आहे हे आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून महाविकास आघाडीची प्रतिमा मलीन करण्याचे कितीही प्रयत्न केले तरी जनतेचा स्वच्छ कौल महाविकास आघाडीलाच आहे, असे ट्वीटही जयंत पाटील यांनी केले आहे.

वाचा: अजित पवारांशी संबधित संपत्तीवर जप्ती?; वकिलाकडून ‘हा’ मोठा खुलासाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: