भाजपने बळजबरीने उमेदवार उभा केला, पण…; नाना पटोलेंचा खोचक टोला


हायलाइट्स:

  • भाजपचा पराभव करत देगलूरची जागा काँग्रेसने राखली
  • विजयानंतर नाना पटोलेंनी घेतला भाजपचा समाचार
  • मोदी लाटेबाबतही केलं भाष्य

मुंबई : नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवत काँग्रेसने ही जागा राखली आहे. या विजयानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole) यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे. ‘देगलूरची जागा काँग्रेस पक्षाचीच होती. पोटनिवडणुकीत ही जागा अधिक मताधिक्क्याने कायम राखली. विरोधी पक्ष भाजपला या मतदारसंघात उमेदवारही मिळाला नाही, त्यांनी नेहमीप्रमाणे दुसऱ्या पक्षाचा उमेदवार बळजबरीने उभा केला, पण जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली,’ अशी टीका पटोले यांनी केली आहे.

‘महाविकास आघाडी सरकार या निकालाने अधिक सक्षम झाले आहे. दोन वर्षात मविआ सरकारने केलेल्या कामाची ही पोचपावती असून महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या भाजपा व त्यांच्या गलिच्छ राजकारणाला जनता कंटाळलेली आहे हेच यावरून दिसते,’ असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

देगलूरमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय; ‘मविआ’चा भाजपला धक्का

कार्यकर्त्यांचे मानले आभार

जितेश अंतापूरकर यांचा ४५ हजारांपेक्षा जास्त मतांनी झालेला विजय हा काँग्रेस पक्षावरचा जनतेच्या विश्वासाचे प्रतिक आहे. हा विजय महाविकास आघाडी सरकारवरच्या कामाला जनतेने दिलेली पोचपावती आहे. मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेकाप यांच्यासह स्थानिक जनता व काँग्रेस कार्यकर्त्यांचे या विजयाबद्दल मनापासूनच धन्यवाद,’ अशा शब्दांत नाना पटोले यांनी आभार मानले आहेत.

bypoll results 2021 : ‘जनतेचा मूड बदलतोय…..’, पोटनिवडणुकीत भाजपच्या पराभवावर बोलली काँग्रेस

‘मोदी नावाची कोणतीही लाट देशात नसून तो एक बागुलबुवा आहे’

देशातील इतर राज्यांमध्येही आज पोटनिवडणुकांचे निकाल लागले. या निकालांवर भाष्य करत नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ‘देगलूरसह देशभरात झालेल्या विधानसभा व लोकसभेच्या पोटनिवडणुकीतही काँग्रेस पक्षाने यशाची पताका फडकावत ठेवली आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा आणि विधानसभेच्या ३ जागांसाठी पोटनिवडणूक झाली, या चारही जागांवर काँग्रेसने विजय मिळवला तर राजस्थान, कर्नाटक येथील जागांवरही काँग्रेसने विजय मिळवला. काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पुन्हा यशस्वी मार्गक्रमण करत आहे. मोदी नावाची कोणतीही लाट देशात नसून तो एक बागुलबुवा आहे. या बागुलबुवाची भीती बाळगण्याचे कारण नाही. तृणमुल काँग्रेसनेही पश्चिम बंगालमध्ये भाजपला नेस्तनाबूत केले तर दादरा नगरहवेलीत शिवसेनेने भाजपाला धक्का देत लोकसभा पोटनिवडणुकीत मिळवलेला विजय हा विरोध पक्षांची वाढती ताकद व भाजपाला जागा दाखवणारा आहे,’ असा हल्लाबोल पटोले यांनी केला आहे.

दरम्यान, सत्तेचा दुरुपयोग करुन विरोधकांना संपवण्याचे काम करणाऱ्यांना, प्रचंड वाढत्या महागाईकडे, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या प्रश्नांकडे, वाढत्या बेरोजगारीकडे दुर्लक्ष करुन जाती-धर्माच्या नावावर राजकीय पोळी भाजणाऱ्या भारतीय जनता पक्षाला जनतेने त्यांची जागा दाखवून दिलेली आहे, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: