पाऊस कुठेही पडू द्या ,पाणी हे आपल्याच तळ्यात आले पाहिजे – प्राध्यापक सतीश देशमुख

राज्य शासनाच्या एनओसीसाठी पाठपुरावा करणार – सतिश देशमुख

करकंब/ मनोज पवार,01/11/2021 – करकंब तालुका पंढरपूर येथे ब्रिटिश कालीन भव्य असा ४५ एकराचा तलाव आहे. हा तलाव जर पूर्ण क्षमतेने भरला तर करकंबच्या पाच-सहा किलोमीटर परिसरापर्यंत पाण्याची पातळी वाढून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. परंतु काळाच्या ओघात त्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्या तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ व झाडांची वाढ झाली असल्याने पाणी साठवण्याची क्षमता कमी झालेली आहे. जर या तलावाची दुरुस्ती करून त्या तळ्यामध्ये पाणी साठवण्यास सुरुवात केली तर करकंब गावाच्या पूर्व भागातील बार्डी, जाधववाडी,बैरागवाडी, टेंभी परिसर,भंडारे वस्ती या भागातील शेतकरी वर्गास या तळ्यातील पाण्याच्या साठवणीमुळे फायदाच होणार आहे. या तळ्यामध्ये पाणी साठवले गेल्यास या परिसरातील विहिरी व बोअरवेल यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे. हेच धोरण डोळ्यासमोर ठेऊन आम्ही आमदार बबनराव शिंदे,जलसंपदा मंत्री जयंत पाटील, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना वेळोवेळी निवेदने देऊन त्याचा पाठपुरावा चालू ठेवला आहे. गरज पडल्यास राज्य शासनाच्या एनओसी साठी सुद्धा प्रयत्न करुन केंद्राच्या माध्यमातून ही योजना पूर्ण करण्यासाठी मदत करणार असल्याचे प्रा.सतिश देशमुख यांनी सांगितले.

   तसेच यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब अंबुरे व मा.जि.प. सदस्य बाळासाहेब देशमुख हे विशेष प्रयत्न करीत आहेत. त्यासाठीच त्यांनी या दौऱ्याचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी केंद्रीय वन विभागाकडून तसेच राज्याकडून येणाऱ्या अडचणी याबद्दल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना माहिती देऊन याचा पाठपुरावा चालू ठेवला होता.

  त्यांच्या या पाठपुराव्यामुळे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी करकंब येथील पाझर तलावास भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणा संदर्भात लवकरच मिटिंग आयोजित करून पाझर तलावातील पाणी साठवण करण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न करीत असल्याबद्दल त्यांचेही आभार सतिश देशमुख यांनी मानले आहेत .

एकंदरीतच ही योजना केंद्राच्या माध्यमातून मार्गी लागू किंवा राज्याच्या माध्यमातून ही योजना मार्गी लागू पण उद्देश मात्र एकच आहे तो म्हणजे पाणी हे गांव तळ्यात आले पाहिजे.पाऊस कुठेही पडू द्या पण पाणी हे आपल्याच तळ्यात आले पाहिजे हीच भूमिका आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: