हायलाइट्स:
- किरीट सोमय्या यांचा महाविकास आघाडीला इशारा
- विश्वजीत कदम यांनी दिलं प्रत्युत्तर
- नवाब मलिक यांची केली पाठराखण
मुंबईतील ड्रग्स आणि त्याच्या तपासाचे सगळे पैलू लोकांना कळले पाहिजेत, या दृष्टीने मंत्री नवाब मलिक यांची मोहीम सुरू असल्याचे सांगत विश्वजीत कदम यांनी नवाब मलिक यांची पाठराखण केली आहे. मंत्री विश्वजीत कदम आज सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.
‘योग्य वेळी सत्य उघडकीस येईल’
काँग्रेसने आज सांगलीत सदस्य नोंदणीला सुरुवात केली. या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. मंत्री कदम म्हणाले, ‘किरीट सोमय्या कसले फटाके फोडणार आहेत, ते अजून समजलं नाही. पण वाढत्या प्रदूषणामुळे फटाके फोडू नयेत, असा त्यांना मी सल्ला देतो. नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत. ते पुरावेही सादर करत आहेत. हा मुद्दा सध्या कोर्टात असल्याने त्यावर अधिक भाष्य करता येणार नाही. पण योग्य वेळी सत्य उघडकीस येईल. ड्रग्स प्रकरणातले सगळे पैलू लोकांना कळले पाहिजेत, या दृष्टीनं नवाब मलिक यांची मोहीम सुरू आहे. समीर वानखेडेंकडून झालेल्या तपासातील सत्य नेमकं काय आहे, ते शोधणे गरजेचं आहे,’ असा हल्लाबोलही त्यांनी केला.
दरम्यान, आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस नंबर वन राहील, असा विश्वासही राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे. राज्यातही काँग्रेस बॅकफूटवर नाही. सांगली जिल्ह्यात सर्वाधिक सदस्य नोंदणी करून महाराष्ट्रात आम्ही आघाडी घेऊ. तसंच गोवा आणि पंजाबच्या निवडणुकांतही काँग्रेस नंबर वन राहील, असा विश्वास मंत्री कदम यांनी व्यक्त केला.