मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर समोर, थेट पोहोचले ईडीच्या कार्यालयात


मुंबई: राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे प्रथमच समोर आले आहेत. देशमुख हे सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) कार्यालयात पोहोचले आहेत.

मनी लॉण्ड्रिंग व खंडणी वसुलीच्या आरोपांच्या प्रकरणात अनिल देशमुख हे सध्या ईडीच्या चौकशीच्या रडारवर आहेत. मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप केले होते. त्याशिवाय, त्यांच्यावर मनी लॉण्ड्रिंगचाही आरोप होता. या आरोपानंतर विरोधकांनी सरकारला लक्ष्य केल्यानंतर देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ईडीनं त्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली होती. देशमुख यांच्या मुंबई व नागपूर येथील घरे, कार्यालये व अन्य संस्थांवर ईडीनं अनेक वेळा धाडी टाकल्या होत्या. देशमुख यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्सही बजावण्यात आलं होतं. मात्र, करोना, वय आणि आजारपणाचं कारण देत सुरुवातीला त्यांनी चौकशीला हजर राहण्यास असमर्थता दर्शवली होती. त्यानंतरही ईडीनं त्यांना चार वेळा समन्स बजावलं. पण ते ईडीसमोर हजर झाले नव्हते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी शोध घेऊनही ते सापडत नव्हते. त्यावरून प्रचंड गदारोळ उडाला होता. माजी गृहमंत्रीच गायब असल्यामुळं राज्य सरकारचीही कोंडी झाली होती. अखेर आज अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत.
ईडीच्या कार्यालयात हजर होण्यापूर्वी अनिल देशमुख यांनी एक व्हिडिओ ट्वीट केला असून आपली बाजू मांडली आहे. ‘ईडीचं पहिलं समन्स आल्यापासून अनिल देशमुख हे ईडीला सहकार्य करत नसल्याचे आरोप होत होते. मात्र, ते खरं नाही. ज्या-ज्या वेळी मला समन्स आलं, त्यावेळी मी ईडीला उत्तर पाठवलं होतं. माझी याचिका उच्च न्यायालयात आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायलयातही मी याचिका दाखल केली आहे. त्याचा निकाल आल्यानंतर मी स्वत: ईडीच्या कार्यालयात येईन, असं मी ईडीला कळवलं होतं. ज्या ज्या वेळी ईडीनं माझ्या घरांवर छापे टाकले, त्यावेळी माझ्या कुटुंबीयांनी, कर्मचाऱ्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केलं. मी स्वत: सीबीआयच्या कार्यालयात दोनदा हजर राहून माझं म्हणणं मांडलं. अजूनही माझी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. पण आज मी स्वत: ईडीच्या कार्यालयात हजर राहिलोय,’ असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
‘परमबीर सिंग यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंग कुठे आहेत? मीडियातील बातम्यांनुसार, परमबीर सिंग विदेशात पळून गेलेत. आरोप करणारेच पळून गेलेत. आज परमबीर यांच्या विरोधात पोलीस खात्यातीलच लोकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत,’ याकडंही देशमुख यांनी लक्ष वेधलं आहे.

हेही वाचा:

देवेंद्र फडणवीस भडकले! म्हणाले, ‘नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध, शरद पवारांनाही…’

‘त्या’ माणसाशी माझा किंवा माझ्या पत्नीचा अजिबात संबंध नाही: फडणवीस



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: