हायलाइट्स:
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२
- मुख्यमंत्र्यांचा थेट तालिबानला ‘एअरस्ट्राईक’चा इशारा
- मुख्यमंत्र्यांच्या भाषणात राम मंदिराचाही मुद्दा
रविवारी लखनऊच्या इंदिरा गांधी प्रतिष्ठानात भाजपच्या ‘सामाजिक संपर्क मोहिमेंतर्गत’ आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सहभागी झाले होते.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंडभरून कौतुक केलं. ‘यावेळेस एका – एका व्यक्तीला जाग करण्याचं काम करायचंय. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश शक्तीशाली आहे. भारताकडे नजर वाकडी करून पाहण्याची इतर कोणत्याही देशाची हिंमत नाही. आज तालिबानमुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान चिंतेत आहे. परंतु, तालिबान्यांना हे माहीत आहे की त्यांची पावलं भारताकडे वळली तर एअरस्ट्राईक निश्चित आहे’ असं वक्तव्य यावेळी योगी आदित्यनाथ यांनी केलंय.
राम मंदिराचा मुद्दा अधोरेखित
विरोधकांवर टीका करताना राम मंदिराचा मुद्दाही योगींनी उचलला. ‘अगोदर रामभक्तांवर गोळ्या झाडल्या जात होत्या. आता पंतप्रधानांनी अयोध्येत येऊन भव्य श्रीराम मंदिराचा शिलान्यास केला आणि तिथं आता राम मंदिर उभं राहतंय’, असंही योगींनी म्हटलंय.
माजी सहकारी ओमप्रकाश राजभर यांच्यावर टीका
या संमेलनात उपस्थित असेलल्या राजभर समाजाच्या नागरिकांना साद घालत योगी आदित्यनाथ यांनी ‘सुहेलदेव भारतीय समाज पक्षा’चे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांच्यावर टीका करण्याची संधी साधली. ‘ओमप्रकाश राजभर यांचे विचार केवळ कुटुंबापुरतेच मर्यादित आहे. वडिलांना मंत्री, एका मुलाला खासदार तर दुसऱ्या मुलाला विधान परिषद सदस्य बनावयचंय. अशा राजकीय ब्लॅकमेलर्सची दुकानं बंद करायची आहेत. मोहम्मद गोरी आणि आक्रांत गाजीचे अनुयायी वोट बँकेच्या भीतीनं हिंदू रक्षक महाराजा सुहेलदेवच्या नावानं घाबरतात. सुहेलदेव यांचं स्मारक उभं राहिलं तर लोक गाझींना विसरून जातील याच भीतीनं ते राष्ट्र रक्षक सुहेलदेव यांच्या स्मारकाला अप्रत्यक्षरित्या विरोध करत आहेत’, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. भाजपचे माजी सहकारी राजभर यांनी २०१९ मध्ये भाजपसोबत आपली युती तोडली होती.