हायलाइट्स:
- किरण गोसावी याचा पाय आणखी खोलात
- वानवडी पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल
- गोसावी याच्याविरोधात हा पुण्यातील तिसरा गुन्हा
किरण गोसावी याला २०१८ मध्ये दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात नुकतीच अटक करण्यात आली आहे. सध्या गोसावी पोलीस कोठडीत आहे. अशातच प्रकाश माणिकराव वाघमारे (रा. महंमदवाडी, हडपसर) यांनी या संदर्भात वानवडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून किरण गोसावी (रा. सानपाडा, नवी मुंबई ) याच्यासह कुसुम गायकवाड (रा. लष्कर) आणि अन्य एका साथीदाराविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोसावी याने वाघमारे आणि त्यांच्या काही मित्रांची २०१८ मध्ये भेट घेतली होती. त्याने तक्रारदाराला परदेशात नोकरीचे आमिष दाखवून वेगवेगळ्या गुंतवणूक योजनांची माहिती दिली होती. त्यानंतर गोसावीची साथीदार कुसुम गायकवाड हिने तक्रारदाराची लष्कर भागात भेटली होती. त्यानंतर त्यांनी तक्रारदाराकडून एक लाख ४५ हजार रुपये घेतले.
याप्रकरणी गोसावीकडे नोकरी मिळवून न दिल्याने पैसे परत मागण्यासाठी विचारणा असता त्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे वाघमारे यांनी तक्रारीत नमूद केलं आहे. सहाय्यक निरीक्षक जयवंत जाधव या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.