Sameer Wankhede NCB Probe वानखेडेंवरील खंडणीचा आरोप: NCBला मुंबई पोलिसांकडून हवी ‘ही’ मदत


हायलाइट्स:

  • क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील खंडणीचा आरोप.
  • वानखेडे यांच्यासह सहा अधिकाऱ्यांची चौकशी.
  • प्रभाकर साईलबाबत आता मुंबई पोलिसांशी संपर्क.

मुंबई:क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील खंडणीच्या आरोपांची एनसीबीचं दिल्लीतील दक्षता पथक चौकशी करत असून या पथकाने एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे तसेच अन्य पाच अधिकारी आणि तीन स्वतंत्र पंच सक्षादारांची आतापर्यंत चौकशी केली आहे. विविध पुरावे आणि दस्तावेजही ताब्यात घेण्यात आले असून खंडणीचा आरोप करणारा पंच साक्षीदार प्रभाकर साईल हा मात्र या चौकशी पथकासमोर अद्याप हजर झालेला नाही. त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असून मुंबई पोलिसांकडे साह्य मागण्यात आले आहे, असे दक्षता पथकाचे प्रमुख आणि एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले. ( Sameer Wankhede Ncb Probe Latest Update )

वाचा: वानखेडेंवरील खंडणीचा आरोप: पोलीस प्रभाकरसह पोहचले ‘त्या’ स्पॉटवर

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खान याला सोडण्यासाठी २५ कोटींची मागणी करण्यात आली होती. याबाबत किरण गोसावी याचं सॅम डिसुझा या व्यक्तीशी बोलणं झालं होतं. यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडे यांना दिले जाणार होते, असा धक्कादायक दावा प्रभाकर साईल याने प्रतिज्ञापत्रावर केला आहे. याच प्रतिज्ञापत्राच्या आधारे एनसीबी महासंचालकांनी चौकशीचे आदेश दिले असताना साईल मात्र चौकशीपासून दूर राहिला आहे. साईल याच्याशी संपर्क साधण्यासाठी सर्व प्रयत्न आम्ही केले. त्यात तो मुंबई पोलिसांच्या संपर्कात असल्याची माहिती आम्हाला मीडियातून मिळाली. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना आजच पत्र लिहिलं आहे व साईल याला एनसीबीसमोर हजर करण्यास साह्य करावे, अशी विनंती केली आहे, असे ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले.

वाचा:आता कायदाच काय ते बोलेल; नवाब मलिकांच्या आरोपांवर समीर वानखेडेंची प्रतिक्रिया

प्रभाकर साईल याच्या आरोपांचा आम्ही स्वतंत्र ठिकाणी तपास केला. गेले तीन दिवस आम्ही प्रथम समीर वानखेडे आणि नंतर पाच इतर अधिकाऱ्यांची चौकशी केली. त्यासोबतच या प्रकरणातील तीन पंच साक्षीदारांची चौकशीही करण्यात आली आहे. अनेक पुरावे आणि दस्तावेज आम्ही गोळा केले असून ते आम्ही पडताळत आहोत. वानखेडे यांच्याकडून आम्ही काही आणखी कागदपत्रे मागितली असून गरज भासल्यास त्यांची पुन्हा चौकशी करण्यात येईल, असेही सिंह यांनी स्पष्ट केले. यात आर्यन खानची चौकशी केली जाणार का, असे विचारले असता या प्रकरणात ज्यांची चौकशी आवश्यक असेल त्या सर्वांची चौकशी केली जाईल, असे सिंह म्हणाले. किरण गोसावी याला सध्या अटक झाली आहे. त्यामुळे त्याच्या चौकशीसाठी आम्हाला न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल, असेही सिंह यांनी सांगितले.

वाचा: काशिफ खान अखेर आला समोर; मलिक यांचे ‘ते’ आरोप फेटाळले, म्हणाला…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: