Narayan Rane: भाजपच्या मेळाव्यात राणेंनी दिला सज्जड दम; ‘निवडणुकीत गद्दारी कराल तर…’


हायलाइट्स:

  • कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात राणेंची मोर्चेबांधणी.
  • भाजप कार्यकर्ता मेळाव्यात राणे यांनी भरला सज्जड दम.
  • आगामी कोणत्याही निवडणुकीत गद्दारी सहन करणार नाही!

सिंधुदुर्ग:कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ पुन्हा काबीज करावा, या मतदारसंघातून पुत्र निलेश राणे यांना विधानसभेवर पाठवावे, यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शुक्रवारी याच पार्श्वभूमीवर कुडाळ येथे भाजप कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी नारायण राणे यांनी आपल्या पराभवाचा उल्लेख करत येणाऱ्या निवडणुकीत गद्दारी मी सहन करणार नाही, असा सज्जड दम कार्यकर्त्यांना भरला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपला शंभर टक्के यश मिळालं, हा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यापर्यंत जायला हवा, अशा पद्धतीने एका निष्ठेने काम करा, असे आवाहनही राणे यांनी केले. ( Narayan Rane Warns Party Workers )

वाचा: मलिक-वानखेडे वादात जयंत पाटील यांनी भाजपला दिला ‘हा’ सल्ला

कुडाळ शहरातील महालक्ष्मी हॉल येथे भाजप कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना येणाऱ्या निवडणुकीसाठी सज्ज होण्यास सांगितलं व स्पष्ट शब्दांत इशाराही दिला. ‘येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत गद्दारी, फितुरी मी सहन करणार नाही. माझ्या निवडणुकीत जे झालं ते मी सहन केलं पण आगामी निवडणुकीत जर कुणी गद्दारी केली… याला पाडा… याला अमूक करा, तमूक करा…असे उद्योग केले तर पाहाच…गद्दाराला पक्षातून काढून टाकणं सोपं आहे पण नकोत्या गोष्टी घडू नयेत याची काळजी सगळ्यांनी घ्या. गद्दारी मला नाही चालणार… मी ती चालू देणार नाही’, असा दमच राणे यांनी भरला. ‘मला काय गरज आहे या सगळ्याची. मी घरी आरामात राहू शकतो. माझे व्यवसाय चांगले चालू आहेत’, असे सांगताना केवळ पक्षासाठी मी काम करत आहे, असे राणे म्हणाले. पक्ष तुम्हाला सगळं काही देतो मग पक्षाचं हित जपणं तुमचं कर्तव्य नाही का? हा जिल्हा शंभर टक्के नारायण राणे यांच्यासोबत आहे हे तुम्ही दाखवून द्या. येणाऱ्या निवडणुका जिंकून राणेंच्या जिल्ह्यात शंभर टक्के भाजप आहे, हा संदेश पक्ष नेतृत्वापर्यंत जायला हवा, असे आवाहनही राणे यांनी केले. जो उमेदवार पक्ष देईल त्याच्या पाठिशी सगळ्यांनी उभं राहायचं आहे. ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यांनी नाराज होण्याचे कारण नाही. पुढच्या निवडणुकीत त्यांचा विचार केला जाईल. मी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असेही राणे यांनी आश्वस्त केले.

वाचा: राज्यातील दीड लाख साखर कामगारांची दिवाळी गोड; १२ टक्के पगारवाढ आणि…

निलेश राणे यांनी यावेळी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आपण कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याचे जाहीरपणे सांगितले. आमदार रवींद्र चव्हाण यांनी मला सिंधुदुर्गात जोमाने काम करायला सांगितले आहे. त्यानुसार मी काम करत आहे. येत्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा बँक या सगळ्या निवडणुका आपल्याला एकहाती भाजपच्या चिन्हावर जिंकायच्या आहेत. त्यानंतर २०२४ मध्ये मलाही येथून जिंकायचे आहे. राज्यात तीन पक्ष एकत्र झाले आहेत. त्यांना पराभूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागले पाहिजे. आता आपणाला विरोधकांच्या विजयाच्या गुलाल उधळलेला बघायचा नाही तर आता फक्त आणि फक्त भाजपच्या विजयाचा गुलाल उधळायचा आहे, असे निलेश राणे म्हणाले. विरोधक आत्मनिर्भर होता कामा नयेत, ते स्थिर होता नयेत, यासाठी आपण काम केले पाहिजे, असेही ते म्हणाले. भाजप प्रदेश सरचिटणीस, आमदार रवींद्र चव्हाण, प्रदेश सचिव निलेश राणे, राजन तेली यावेळी उपस्थित होते.

वाचा: काशिफ खान अखेर आला समोर; मलिक यांचे ‘ते’ आरोप फेटाळले, म्हणाला…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: