म्हणून मी वानखेडेंच्या पहिल्या पत्नीचे फोटो ट्वीट केले; नवाब मलिक यांचा मोठा गौप्यस्फोट


हायलाइट्स:

  • नवाब मलिक यांनी घेतली मुंबईत पत्रकार परिषद
  • वानखेडे कुटुंबीयांचे सर्व आरोप फेटाळले
  • शबाना कुरेशींचा फोटो का शेअर केला?; मलिक यांनी केला खुलासा

मुंबई: मुंबई ड्रग्ज प्रकरणातील फरार पंच किरण गोसावीला झालेली अटक आणि आर्यन खान (Aryan Khan) याला मिळालेल्या जामिनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) हे अधिकच आक्रमक झाले आहेत. मलिक यांनी लढाई पुढं सुरू ठेवणार असल्याचं सांगतानाच समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या कुटुंबीयांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.

समीर वानखेडे यांच्या कथित गैरकृत्यांचे पुरावे म्हणून नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसांत वानखेडे यांच्या कुटुंबातील अनेकांचे फोटो शेअर केले होते. वानखेडे यांची पहिली पत्नी शबाना कुरेशी हिचा लग्नातील फोटोही त्यांनी शेअर केला होता. याशिवाय, वानखेडे यांच्या बहिणीचा फोटोही शेअर केला होता. त्यावरून वानखेडे कुटुंबीयांनी त्यांच्यावर टीका केली होती. मलिक हे विनाकारण आमच्या कुटुंबाला वादात ओढत आहेत. त्यांच्याविरुद्ध खटला दाखल करू, असा इशाराही वानखेडे कुटुंबानं दिला होता. या सगळ्या आरोपांना मलिक यांनी आज उत्तर दिलं.

वाचा: …तोपर्यंत हा पिक्चर सुरूच राहील; नवाब मलिक यांचा इशारा

‘वानखेडेंनी सगळे हातखंडे वापरून पाहिलेत. माझ्या कुटुंबावर निराधार आरोप केले जाताहेत असं त्यांचं म्हणणं होतं. पण माझी लढाई कुणाच्या कुटुंबाविरुद्ध किंवा धर्माशी संबंधित नाही. माझी लढाई अन्यायाविरुद्ध आहे. मुंबईच्या तुरुंगात आजही १०० पेक्षा अधिक लोक असे आहेत, ज्यांना चुकीच्या पद्धतीनं अडकवलं गेलंय. त्यांची सुटका होईपर्यंत ही लढाई सुरू राहील,’ असं मलिक म्हणाले.

कुटुंबाला वादात ओढल्याचा आरोपही त्यांनी फेटाळला. ‘समीर वानखेडे यांच्या दिवंगत आईचं नाव मी कधीही जाहीरपणे घेतलं नाही किंवा त्यांच्यावर चिखलफेक केली नाही. वानखेडेंचा जो जन्मदाखला मी ट्विटरवर शेअर केला होता. त्यात त्यांच्या वडिलांचं नाव ‘दाऊद वानखेडे‘ होतं, एवढंच म्हटलं होतं. त्यांच्या बहिणीबद्दल मी प्रश्न उपस्थित करण्यामागे कारण होतं. एनसीबीच्या अनेक प्रकरणात पंच असलेल्या फ्लेचर पटेल याचे वानखेडे कुटुंबाशी संबंध होते हे मला सांगायचं होतं. या फ्रॉड माणसासोबत यांच्या बहिणीचे फोटो होते, तो तिला लेडी डॉन म्हणायचा, म्हणून मी ते शेअर केले होते, असं मलिक यांनी सांगितलं.

वाचा: आर्यन खानला आधीच जामीन मिळाला असता, पण…; नवाब मलिक यांचं गंभीर विधान

‘समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीचे फोटो मी सोशल मीडियावर टाकले. त्यावरून माझ्यावर अनेकांनी टीका केली. मात्र, हे फोटो मला रात्री दोन वाजता एका व्यक्तीनं पाठवले होते. ‘ज्यांचा हा फोटो आहे, त्यांची इच्छा आहे की हा फोटो आपण जाहीर करावा’, असा मेसेज त्यासोबत होता. म्हणून मी तो फोटो टाकला होता,’ असा गौप्यस्फोट मलिक यांनी केला. मात्र, समीर वानखेडे यांच्या दुसऱ्या पत्नीचं मी कधी नावही घेतलेलं नाही किंवा त्यांच्याबद्दल मी कधीही कुठली टिप्पणी केलेली नाही,’ असं मलिक यांनी स्पष्ट केलं.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: