हायलाइट्स:
- परमबीर सिंग यांच्या विरुद्ध ठाणे कोर्टाचे अजामीनपात्र वॉरंट.
- या अगोदर सिंग यांच्या विरोधात लुकआऊट नोटीसही जारी.
- सिंग यांच्यावर कठोर कारवाई करत त्यांचे वेतन थांबवण्याचा राज्य सरकारचा निर्णय.
वसुली प्रकरणातील आरोपी परमबीर सिंग यांच्यावर आयपीसीच्या अनेक कलमांअंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. हे लक्षात घेता सिंग यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. ठाण्याचे मुख्य न्यायदंडाधिकारी आर. जे. तांबे यांनी सिंग यांच्याविरुद्ध हे वॉरंट बजावले आहे.
क्लिक करा आणि वाचा- अण्णा हजारेंना वंदन म्हणजे ईश्वराला वंदन, त्यांनी मोदींनाही रस्ता दाखवला; राज्यपालांची स्तुतिसुमने
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईतील अँटिलिया स्फोटके प्रकरणात गंभीर आरोप केले होते. सिंग यांनी केलेल्या आरोपांमध्ये १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट पोलिसांना दिले जात असल्याच्या गंभीर आरोपाचा समावेश आहे. एकीकडे सिंग यांनी देशमुख यांच्यावर वसुलीबाबतचे गंभीर आरोप केल्यानंतर परमबीर सिंग यांच्यावरही गंभीर आरोप झाले. त्या प्रकरणी मुबई आणि ठाण्यात सिंग यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्री म्हणाले,’इंधन दरवाढ ही आपल्या भल्यासाठीच, खरं की खोटं?’
परमबीर सिंग यांच्यावर हे गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध लुकआऊट नोटीसही जारी करण्यात आली. त्यानंतर सिंग हे बेपत्ता असल्याचे स्पष्ट झाले. तपास यंत्रणांनाही त्यांचा शोध घेता आलेला नाही. अशा परिस्थितीत आता त्याच्याविरुद्ध ठाणे कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
परमबीर सिंग यांना अँटिलिया स्फोटक प्रकरणी आरोपी करण्यात आल्यानंतर ते रजेवर गेले होते. तेव्हापासूनच ते कोणाच्याही संपर्कात नाहीत. त्यांचा संपर्कच होत नसल्याचे पाहून शेवटी त्यांचे वेतन थांबवण्याचे आदेश बुधवारी राज्य सरकारने दिले.
क्लिक करा आणि वाचा- समीर वानखेडेंची अडचण वाढणार? नवाब मलिक यांचा वानखेडेंवर मोठा आरोप
याबरोबरच परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. परमबीर सिंग यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी अनेकदा समन्स बजावण्यात आले आहेत. मात्र ते केव्हाही हजर राहू शकलेले नाहीत. हे पाहता परमबीर सिंग देश सोडून पळून गेले असावेत, असा संशय तपास यंत्रणांना आहे.