२०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलची गोष्ट
१८ जून २०१७. चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना ओव्हलवर होणार होता. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्या सामन्यात अश्विन आणि जडेजा दोघेही प्लेइंग-११ चा भाग होते. या दोघांशिवाय भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि केदार जाधव यांच्यावरही गोलंदाजीची जबाबदारी होती, पण यापैकी एकाही गोलंदाजाला पाकिस्तानच्या फलंदाजांना बाद करता आले नाही. २३ व्या षटकात १२८ धावांवर पाकिस्तानची पहिली विकेट पडली. पाकिस्तानच्या आघाडीच्या फळीतील तिन्ही फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली. अझहर अलीने ५९, फकर झमानने ११४ आणि बाबर आझमने ४६ धावा केल्या.
या सामन्यात अश्विनने १० षटकांत ७०, तर जडेजाने ८ षटकांत ६७ धावा दिल्या. या दोघांच्या खात्यात एकही विकेट आली नाही. पाकिस्तानने भारताला विजयासाठी ३३९ धावांचे लक्ष्य दिले होते. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची चांगलीच दमछाक झाली आणि एकूण ३०.३ षटकांत सर्वबाद १५८ धावा झाल्या. पाकिस्तानने हा सामना १८० धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. यानंतर विराट कोहलीचा अश्विन आणि जडेजावरील विश्वास कमी झाला.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने वरुण चक्रवर्तीचा ‘मिस्टी’ स्पिनर म्हणून संघात समावेश केला होता, पण वरुण काही चमत्कार करू शकला नाही. तेव्हापासून विराट कोहली आणि संघ व्यवस्थापन आर. अश्विनला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. अश्विन हा अनुभवी गोलंदाज आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सर्व प्रकारच्या विकेट्सवर गोलंदाजी करण्याची त्याची क्षमता आहे. तो ‘व्हेरिएशन’ करण्यात माहीर आहे. एका ओव्हरमध्ये ६ चेंडू वेगवेगळ्या प्रकारे त्याला टाकता येतात. भारतीय संघाला नंतर गोलंदाजी करायची असेल, तर ओल्या चेंडूसोबत गोलंदाजी करण्याची कला अश्विनकडे आहे.
याशिवाय न्यूझीलंड संघात जेम्स नीशम, डेव्हॉन कॉन्वे आणि मिचेल सँटनरसारखे खेळाडू आहेत, जे डाव्या हाताने फलंदाजी करतात. अश्विन अशा फलंदाजांना अडचणीत आणू शकतो. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर भारताच्या प्लेइंग-११ वर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. या पराभवानंतर अश्विन टीम इंडियाच्या सरावातही सक्रिय होताना दिसला. जवळपास पाच वर्षांनंतर जडेजा आणि अश्विन पुन्हा एकदा टीम इंडियाला अडचणीतून बाहेर काढण्याच्या तयारीत असल्याचे ही चिन्हे दर्शवतात.