Sameer Wankhede: वानखेडे यांची ४ तास चौकशी; साईल आलाच नाही, गोसावीबाबत सिंह म्हणाले…


हायलाइट्स:

  • समीर वानखेडे यांची चार तास चौकशी.
  • प्रभाकर साईल चौकशीपासून राहिला दूर.
  • तपास पथकाचे गोसावी, साईलला आवाहन.

मुंबई: मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला सोडण्यासाठी २५ कोटींची मागणी करण्यात आल्याचा दावा या प्रकरणातील पंच साक्षीदार प्रभाकर साईल याने केला आहे. त्याच्या प्रतिज्ञापत्राची दखल घेत एनसीबी महासंचालकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दिल्ली येथून आलेल्या एनसीबीच्या दक्षता विभागाच्या टीमने आज मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांची चार तास चौकशी केली. या चौकशीपासून प्रभाकर साईल हा मात्र दूर राहिला. ( Sameer Wankhede Probe Latest Update )

वाचा: नवाब मलिक यांना रोखण्यासाठी याचिका; ‘या’ विनंतीवर हायकोर्ट म्हणालं…

एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय टीम चौकशीसाठी मुंबईत आली आहे. या टीमने आज समीर वानखेडे यांची चौकशी केली. त्यानंतर सिंह यांनीच माध्यमांना याबाबत माहिती दिली. ‘क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर जी कारवाई करण्यात आली. त्या प्रकरणातील पंच साक्षीदार प्रभाकर साईल याच्या प्रतिज्ञापत्रातील आरोपांची आम्ही सत्यता पडताळत आहोत. एनसीबीच्या मुंबई कार्यायातून यासंबंधीची कागदपत्रे आम्ही आज प्राप्त केली. समीर वानखेडे यांची जवळपास चार ते साडेचार तास चौकशी करण्यात आली. त्यात त्यांनी आपली बाजू मांडताना अनेक बाबी समोर ठेवल्या आहेत. त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला असून येत्या काळात गरज भासल्यास त्यांची अधिक चौकशी करण्यात येईल’, असे सिंह यांनी नमूद केले. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाच्या तपासातून वानखेडे यांना हटवले जाणार का, असे विचारले असता, आता काहीच सांगता येणार नाही. आम्ही चौकशी सुरू केली आहे. ही चौकशी पुढे जाऊ द्या. यात काही ठोस पुरावे मिळाले तरच मला महासंचालकांकडे अहवाल देता येईल, इतकेच उत्तर सिंह यांनी दिले.

वाचा:समीर वानखेडे यांच्यावर कारवाई होईल का?; उज्ज्वल निकम यांनी मांडले महत्त्वाचे मत

या प्रकरणात प्रभाकर साईल आणि किरण गोसावी यांना नोटीस पाठवली गेली होती. मात्र, एकाचा पत्ता चुकीचा आढळतोय तर दुसऱ्याच्या घराला टाळे असल्याने नोटीस त्यांच्यापर्यंत पोहचू शकलेली नाही. त्यामुळे माध्यमातूनच मी त्या दोघांनाही आवाहन करत आहे. त्यांनी तपासात सहभागी व्हावे. आमची टीम उद्या आणि परवा असे दोन दिवस मुंबईत आहे. त्यांनी वांद्रे सीआरपीएफ मेस या त्रयस्थ ठिकाणी यावे आणि आपली बाजू मांडावी, असे सिंह म्हणाले. या प्रकरणाची आम्ही निष्पक्षपणे चौकशी करत आहोत. त्यामुळे सगळ्या बाजू तपासूनच आम्ही निष्कर्षापर्यंत पोहचणार आहोत, असेही सिंह म्हणले. समीर वानखेडे यांच्याविरुद्ध आणखी एका पंच साक्षीदाराने आज आरोप केले आहेत. त्याबाबत विचारले असता, सध्या प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश आहेत आणि आम्ही ती चौकशी करत आहोत, असे उत्तर सिंह यांनी दिले.

वाचा: हे सगळं कुठवर जाणार? समीर वानखेडेंच्या विरोधात आणखी एक पंच समोरSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: