हायलाइट्स:
- खुराड्यातून दोन कोंबड्या चोरुन नेल्या
- आलिशान कारमधून आलेल्या तरुणाचं कृत्य
- कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेची सर्वत्र चर्चा
कोंबड्या बोका किंवा मुंगसाने नेल्या असाव्यात असं हॉटेल मालकाला वाटलं होतं. पण चक्क कारमधून आलेल्या तरुणाने कोंबड्या चोरल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली.
निपाणी देवगड या राज्य मार्गावर गैबी पीर नावाचे ठिकाण आहे. या मार्गावरुन थेट राधानगरी, काळम्मावाडी, कोकणात जाता येते. त्यामुळे या मार्गावर सातत्याने पर्यटक आणि वाहनांची वर्दळ असते. गैबी पीर फाट्यावर शांतता भवन नावाचे हॉटेल असून शनिवारी चार पर्यटक एका कारमधून दुपारी चारच्या सुमारास आले होते. चौघांनी हॉटेलमध्ये नाष्टा केला. दीडशे रुपये बील देऊन चौघे हॉटेलमधून बाहेर पडले. त्या चौघांपैकी एकजण हॉटेलच्या मागे गेला आणि त्या ठिकाणी असलेल्या कोंबड्याच्या खुराड्यातून दोन कोंबड्या चोरल्या आणि कारच्या दिशेने निघून गेला.
खुराड्यातील दोन कोंबड्या बोक्याने किंवा मुंगसाने खाल्ल्या असतील असं मालकांना वाटलं. पण चार दिवसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन कोंबड्या चोरीस गेल्याचं लक्षात आलं. हॉटेल मालकाने राधानगरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार केली असल्याचं समजतं, पण पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही तक्रार आली नसल्याचं सांगितलं आहे.