पंढरपूर तालुक्यातील 16 हजार शेतकऱ्यांना मिळणार लवकरच न्याय ?

पंढरपूर तालुक्यातील 16 हजार शेतकऱ्यांना मिळणार लवकरच न्याय ,राष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्याणराव काळे यांच्या प्रयत्नांना यश
पंढरपूर - पंढरपूर तालुक्यातील उपरी,शेळवे, वाडीकुरोली, खेडभाळवणी, भंडीशेगाव,कौठाळि, शिरढोण आदी गावांमधून उजनी उजवा कालव्याचा उपफाटा गेला आहे. यासाठी हजारो शेतकऱ्यांच्या काळ्या कसदार जमिनी वापरल्या गेल्या. परंतु 30 वर्षानंतरही बाधित शेतकर्‍यांना जमिनीचा कोणताही मोबदला मिळालेला नाही.त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी उजनी संघर्ष समितीच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलने केली असून त्या जनआंदोलनाचा एक भाग म्हणून राष्ट्रवादीचे नेते व सहकार शिरोमणी चेअरमन कल्याणराव काळे यांनी प्रयत्न करत पुणे येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक विलास राजपूत यांच्या दालनात एक बैठक संपन्न झाली. या बैठकीला उजनीचे व सर्व अधिकारी ,शेतकरी उपस्थित होते. या बैठकीमध्ये रेडीरेकनरच्या पाचपट वाढीव मोबदला,नव्याने सॅटॅलाइट चा आधार घेऊन पिक पाणी नोंदी करणे,वस्तुनिष्ठ मूल्यांकन आदी विषयांबाबत सकारात्मक चर्चा झाली असून ही सर्व प्रक्रिया एक महिन्याच्या आत पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वासन संचालक राजपूत यांनी दिले.त्यामुळे सोळा हजार शेतकऱ्यांना तब्बल तीस वर्षानंतर योग्य न्याय मिळण्यासाठी सकारात्मक पाऊल पडेल असे वाटत आहे.

      कॅनल बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी उजनी संघर्ष समिती अनेक दिवसांपासून शासन व प्रशासनासोबत संघर्ष करत आहे. मध्यंतरी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बैठक घेऊन प्रत्यक्षात शेताच्या बांधावर,कॅनलवर येऊन पाहणी करण्याचे आश्वासन दिले होते मात्र महिन्यानंतरही जिल्हाधिकारी बांधावर आले नसल्यामुळे बाधित शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे . 

   सांगोला मतदार संघाचे आमदार शहाजी पाटील यांनीही कॅनल बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी पाठींबा दिला आहे.कल्याणराव काळे यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना याबाबत निवेदन देऊन बाधित शेतकऱ्यांना न्याय देण्याची विनंती केली होती. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काळे यांच्या पत्राची दखल घेऊन कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक व संबधीत अधिकाऱ्यांना त्वरित एक बैठक घेण्याचे आदेश दिले त्यानुसार सोमवारी पुणे येथे बैठक पार पडली.

या बैठकीमध्ये चेअरमन कल्याणराव काळे यांनी आम्ही गेल्या 30 वर्षापासून अन्याय सहन करत आहोत,जमिनीमधून कॅनल गेला परंतु आमच्या वाट्याला केवळ मनस्तापाशिवाय दुसरे काही आले नाही.जिरायत भागात जादा दर मात्र आमच्या बागायती जमिनीला कवडीमोल दर हा तसेच जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये जादा दर मात्र पंढरपूर तालुक्यात अत्यंत तुटपुंजा दर असा दुजाभाव का ? त्यामुळे आता आम्ही स्वस्थ बसणार नाही. योग्य न्याय न मिळाल्यास सिंचन भवनासमोर धरणे आंदोलन करू असा इशारा दिला. बैठकीत सर्व मुद्दे पुराव्यानिशी सादर केल्यामुळे संचालक विलास राजपूत यांनी अधिकाऱ्यांना वस्तुनिष्ठ मूल्यांकन अहवाल सादर करणे, सर्व पीक पाण्याची सॅटलाईट द्वारे माहिती घेणे,ज्या ठिकाणी अवार्ड झाले नसतील त्या ठिकाणी त्वरित अवार्ड करून घेणे, जिल्हाधिकारी सोलापूर यांना अहवाल सादर करणे आदी सूचना देत शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळवून देण्या बाबत मूल्यांकन समितीलाही पत्र देण्याच्या सूचना दिल्या. गेल्या तीस वर्षांपासून तालुक्यातील जवळपास 16 ते 17 हजार शेतकरी योग्य मोबदल्यापासून वंचित आहेत.अधिकार्‍यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व प्रक्रिया एक महिन्याच्या आत पूर्ण करून बाधित शेतकऱ्यांना योग्य न्याय दिला जाईल असे आश्वासन कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक विलास राजपूत यांनी दिले.

 याप्रसंगी सोलापुर अधिक्षक अभियंता जयंत  शिंदे,मंगळवेढा कार्यकारी अधिकारी एन.व्ही. जोशी यांच्यासह बाळासाहेब नागटिळक,प्रविण नागणे, रामभाऊ गायकवाड आदी उपस्थित होते. 

महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उजनी कॅनल वितरीका 21 व 24 वरील बाधित शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळावा यासाठी आमचा पाठपुरावा सुरू असून संबंधित विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे – कल्याणराव काळे

पंढरपूर तालुक्यातील 16 हजार शेतकऱ्यांना मिळणार लवकरच न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. काही मध्यस्थांनी या बाधित शेतकर्यांशी संपर्क साधून त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्याचे काही अर्थपूर्ण अटीवर मान्य केले असल्याचे काही शेतकर्‍यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली असून ही बाब चिंताजनक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: