वानखेडेंवर पाळत ठेवत असल्याच्या आरोपांवर मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण; ते दोन पोलीस तर…


हायलाइट्स:

  • समीर वानखेडेंवर पाळत ठेवत असल्याचा आरोप
  • वानखेडेंनी दाखल केली होती तक्रार
  • मुंबई पोलिसांनी दिलं स्पष्टीकरण

मुंबईः क्रूझवरील अमली पदार्थांच्या पार्टीवर केलेल्या कारवाईनंतर ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ (एनसीबी) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये सुरू असलेला वाद वाढल्याचे चित्र आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (sameer wankhede)यांनी आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप केला होता. वानखेडेंच्या या आरोपांवर आता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) स्पष्टीकरण दिलं आहे.

मुंबईचे पोलिस आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी केला होता. वानखेडे यांनी राज्याचे पोलिस महासंचालकांचीही भेट घेतली होती. तसंच, पुरावेही त्यांनी सादर केले होते. स्मशानभूमीत आईच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जात असताना दोन संशयीत व्यक्ती आपला पाठलाग करत असल्याचे वानखेडेंना लक्षात आले, त्यानुसार त्यांनी सीसीटीव्ही फुटेजही मिळवले होते. तसंच, पाठलाग करणाऱ्या दोन व्यक्तींपैकी एक व्यक्ती मुंबई पोलिस दलात एका महत्वाच्या पदावर कार्यरत असल्याचा दावाही वानखेडे यांनी केला होता. समीर वानखेडेंनी केलेल्या या तक्रारीवर आता मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यातील गुप्तहेरांकडून हेरगिरी केली जात असल्याच्या तक्रारीत तथ्य नाही, असं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. तसंच, ते दोन पोलीस ओशिवरा स्मशानभूमीत वाहन चोरीच्या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यासाठी गेले होते, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

वानखेडे दिल्लीत

एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे हे मंगळवारी दिल्लीतील एनसीबीच्या मुख्य कार्यालयात दोन तास होते. मागच्या दाराने त्यांनी कार्यालयात प्रवेश करीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी कार्यालयाबाहेर वानखेडे यांच्या समर्थनार्थ काही लोकांनी फलक झळकावले. आरोपांच्या चौकशीसाठी वानखेडे यांना आम्ही बोलावलेले नाही, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: