हायलाइट्स:
- शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक
- १ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
- गिरीश महाजन यांनी दिली माहिती
मंगळवारी शहरातील जी. एम. फाऊंडेशनच्या कार्यालयात भाजपच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महाजन बोलत होते. या पत्रकार परिषदेत भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, चंदूलाल पटेल, जि.प.अध्यक्षा रंजना पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, जि.प. उपाध्यक्ष लालचंद पाटील, महानगरप्रमुख दीपक सुर्यवंशी, नगरसेवक राजेंद्र घुगे-पाटील, डॉ. राधेश्याम चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.पाटील आदींसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या या मोर्च्यात जिल्हाभरातील शेतकरी देखील सहभागी होणार असल्याचं गिरीश महाजनांनी सांगितलं. ‘शेतकऱ्यांचं आर्थिक कंबरडे मोडलं गेलं आहे. अशा परिस्थितीत बिलांची रक्कम भरण्याचं फर्मान राज्य शासनानं काढला आहे. तसंच ही रक्कम न भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा बंद केला आहे. अशा शेतकरी विरोधी शासनाचा आम्ही निषेध करतो, असंही गिरीश महाजन म्हणाले. जळगावात होणारा हा मोर्चा भूतो न् भविष्यती राहील, असा दावा देखील त्यांनी केला.
‘आर्यन खानसाठी मंत्रिमंडळ कामाला आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष’
‘एका आर्यन खानसाठी राज्याचे संपूर्ण मंत्रिमंडळ कामाला लागलं आहे. यासाठी एका कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यावर आरोप केले जात आहेत. आर्यन खानसाठी गळा काढणाऱ्या राज्यातील मंत्र्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्नावर मात्र गळा काढला नाही. एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी गळा काढला नाही. शेतकरी अडचणीत आहे. मात्र, शेतकऱ्यांपेक्षा त्यांना आर्यन खान प्रिय वाटत आहे,’ असा घणाघातही गिरीश महाजन यांनी केला आहे.