ठाणे: ड्रग्ज प्रकरणात NCB नं टाकलेले अनेक छापे आणि
समीर वानखेडे (
Sameer Wankhede) यांच्याबद्दल नवाब मलिक यांनी पुराव्यासह काही गोष्टी समोर आणल्या आहेत. हे एकंदर प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणी योग्य ती पावले टाकली जातील,’ असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री
जयंत पाटील (
Jayant Patil) यांनी दिले आहेत. त्यामुळं या प्रकरणात आता राज्य सरकार लक्ष घालण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
ठाण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. ‘महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा पूर्ण प्रयत्न भाजपकडून करून झाला आहे. पण हे सरकार पडत नाही असं दिसल्यावर सरकार व मंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आर्यन खान हे प्रकरण त्याचाच भाग आहे. आर्यन खान प्रकरण बोगस असल्याचं नवाब मलिक यांनी पुराव्यासह उघड केलं आहे. आज समीर वानखेडे यांचा जन्माचा दाखला त्यांनी प्रसिद्ध केलाय. त्यावरून समीर वानखेडे यांनी मागासवर्गीय असल्याचं दाखवून फायदा मिळवला असल्याचं दिसत आहे,’ असंही पाटील म्हणाले.
वाचा: माझ्या वडिलांचं नाव दाऊद नाही, ज्ञानदेव आहे; समीर वानखेडे संतापले
प्रभाकर साईल यानं एनसीबी व समीर वानखेडे यांच्या विरोधात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे, हे सर्व धक्कादायक आहे. मुंबईतील चित्रपट उद्योगाला आणि महाराष्ट्र बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे. ईडी, सीबीआय, आयटी या यंत्रणा कमी पडल्यामुळे आता एनसीबी ॲक्टिव्ह झालेली दिसते. एनसीबीच्या धाडींमध्ये भाजपचे कार्यकर्तेच संशयितांना पकडताना दिसत आहेत,’ असाही आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.
वाचा: सततच्या आरोपांविरोधात समीर वानखेडेंनी उचललं ‘हे’ पाऊल