हायलाइट्स:
- रोहरू – बरुआ कांडा – किन्नौर मार्गावर ट्रेकर्स अडकले
- ट्रेकर्स, गाईड, शेर्पा अशी एकूण २२ जणांची टीम
- तीन जणांचा मृत्यू, उर्वरीत १० ट्रेकर्सना सुरक्षित स्थळी आणण्यात यश
- रेस्क्यू करण्यात आलेल्या ट्रेकर्स रुग्णालयात दाखल
हाती आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील १२ आणि पश्चिम बंगालच्या एका ट्रेकर्ससहीत १३ ट्रेकर्स रोहरू – बरुआ कांडा मार्गानं किन्नौरच्या सांगलाकडे जात असताना ही दुर्घटना घडली. १३ ट्रेकर्ससहीत गाईड आणि शेर्पा असे एकूण २२ जण या टीममध्ये सहभागी होते. मोठी बर्फवृष्टी झाल्यानं बरुआ कांडा भागात हे ट्रेकर्स अडकून बसले. या ट्रेकर्सपैंकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर १० जणांना रेस्क्यू करण्यात आलंय. या ट्रेकर्सना उपचारासाठी आणि देखरेखीसाठी ‘किल्बा सिव्हिल रुग्णालया’त दाखल करण्यात आलंय.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षितस्थळी पोहचलेल्या ट्रेकर्सनं मृत व्यक्तींसंबंधी माहिती दिलीय. यामध्ये दीपक नारायण राव (५८ वर्ष), राजेंद्र भालचंद्र पाठक (६५ वर्ष) आणि अशोक मधुकर भालेराव (६४ वर्ष) या महाराष्ट्रातील तीन ट्रेकर्सचा समावेश आहे.
तीन्ही ट्रेकर्सचे मृतदेह जवळपास १५,००० फूट उंचीवर आहेत. भारतीय हवाई दल आणि आयटीबीपीची टीम मृतदेह ताब्यात घेण्यासाठी लवकरच घटनास्थळी पोहचण्याचा प्रयत्न करत आहे.
यापूर्वी, गेल्या आठवड्यात उत्तराखंडात झालेल्या बर्फवृष्टीतही मोठी दुर्घटना घडल्याचं समोर आलं होतं. यामध्ये तब्बल ११ ट्रेकर्सचा मृत्यू झाला होता. मृतदेह बाहेर काढण्यासाठी आणि मदतीसाठी वायुसेनेकडून रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं होतं. १८ ऑक्टोबर रोजी बर्फवृष्टीमुळे ट्रेकर्स आणि गाईडसहीत एकूण १७ जण रस्त्यात अडकून पडले होते. लमखागा भागातील थंडीत ११ जणांचा मृत्यू झाला होता.