भारताच्या पाचवीला आफ्रिदीच पुजलेला; एक होता शाहिद आणि आता आला शाहिन, दोघांचं नातं आहे काय पाहा…


दुबई : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी हा भारताविरुद्धचा सामान असताना नेहमीच ट्रोल झालेला सर्वांनीच पाहिला आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात शाहिद आक्रमक खेळायचा आणि त्याचबरोबर भारताच्या विजयात काटा ठरायचा. पण शाहिद असताना पाकिस्तानला एकदाही भारतावर विश्वचषकात विजय मिळवता आला नव्हता. पण आता शाहिद नसला तरी पाकिस्तानच्या संघात शाहिन आफ्रिदी आहे आणि तो पाकिस्तानच्या ऐतिहासिक विजयाचा शिल्पकार ठरला आहे. त्याचबरोबर शाहिद आणि शाहिन या दोन्ही आफ्रिदींमध्ये खास नातं असल्याचंही आता समोर आलं आहे.

शाहिनने रविवारच्या भारताविरुद्धच्या सामन्यात कमालच केली. आपल्या पहिल्याच स्पेलमध्ये शाहिनने रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांना बाद केलं आणि पाकिस्तानच्या विजयाचा पाया रचला. कारण हे दोघेही भारतासाठी मॅचविनर खेळाडू होते. रोहितला तर भोपळादेखील शाहिनने फोडू दिला नाही. त्यानंतर राहुलला फक्त तीन धावांमध्येच त्याने तंबूचा रस्ता दाखवला. या दोन्ही धक्क्यानंतर भारतीय संघ सावरू शकला नाही. त्यामुळे हे दोन धक्के भारताला पराभवाच्या दिशेने घेऊन गेल्याचे पाहायला मिळाले. एकेकाळी शाहिद आफ्रिदी भारताला त्रास द्यायचा, पण आता तीच गोष्ट शाहिन करताना दिसत आहे. शाहिद आणि शाहिन यांच्यामध्ये खास नातंही आहे. शाहिन हा शाहिदचा होणारा जावई असल्याचे आता समोर आले आहे. कारण शाहिदच्या मोठ्या मुलीशी शाहिनचे लग्न ठरवण्यात आले आहे. त्यामुळे शाहिद आणि शाहिन यांच्यामध्ये सासरे आणि जावई, असं नातं काही दिवसांतच तुम्हाला पाहायला मिळू शकतं. पण दुसरीकडे आफ्रिदी हे आडनाव भारताच्या पाचवीलाच पुजल्याचे पाहायला मिळत आहे. कारण हे आडनाव भारताची पाठंच सोडत नसल्याचे दिसत आहे. आधी शाहिद होता आणि आता भारताला त्रास द्यायला शाहिन तयार आहे. त्यामुळे हे आफ्रिदी नाव भारताचा पिच्छा नेमकं कधी सोडणार, याची वाट भारतीय चाहते बघत असतील. कारण गेल्या बऱ्याच वर्षांपासून जेव्हा भारत आणि पाकिस्तानचा सामना होतो, तेव्हा आफ्रिदीची आठवण आल्यावाचून चाहत्यांना राहत नाही.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: