भारतीय संघाने विश्वचषकामध्ये दोन सराव सामने खेळले होते. या दोन्ही सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला होता. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात इशान किशनने दमदार ७० धावांची खेळी साकारली होती, त्याला लोकेश राहुलने चांगली साथ दिली होती. त्यामुळे आता इशानने भारताच्या सलामीसाठी जागा निश्चित केली आहे, असे वाटत होते. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यात रोहित शर्माकडे भारताचे नेतृत्व देण्यात आले होते आणि तोच सलामीला आला होता. रोहितने सलामीला येत धडाकेबाज फलंदजाी केल्याच पाहायला मिळाले होते. या सामन्यासाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. पण तरीही विराट या सामन्यात गोलंदाजी करताना पाहायला मिळाला होता. त्यामुळे विराट आता पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही गोलंदाजी करणार का, याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे. विश्वचषकापूर्वी हार्दिक पंड्या चांगलाच ट्रोल झालेला पाहायला मिळाला होता. पण विश्वचषकातील दोन्ही सराव सामन्यांमध्ये त्याने चांगली फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले होते. हार्दिक आता विश्वचषकात गोलंदाजी करणार नाही, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे फक्त एक फलंदाज म्हणून तो आपल्या संघातील जागा कायम ठेवतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. भारताच्या वेगवान गोलंदाजांनीही या दोन्ही सामन्यांत चांगली कामगिरी केली होती. जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी यांनी पहिल्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती. भुवनेश्वर कुमारला पहिल्या सामन्यात चांगली गोलंदाजी करता आली नसली तरी त्याला दुसऱ्या सामन्यात चांगलीच लय सापडली होती. त्यामुळे आता पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात या तिघांपैकी कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता सर्वांना होती. त्याचरोबर भारतीय संघात फिरकीपटूंमध्येही चांगलीच स्पर्धा असल्याचे पाहायला मिळाले होते.