आयुष्यामध्ये चांगला गुरु मिळणे हे भाग्य लागते – हभप चैतन्य महाराज देगलूरकर

सद्गुरु मार्गाशिवाय सद्गती प्राप्त होणार नाही – हभप चैतन्य महाराज देगलूरकर
 पंढरपूर /प्रतिनिधी - शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्रह्मवृंद संस्थेचे संस्थापक पंडितप्राण भगवान शास्त्री धारूरकर यांच्या ४४ व्या पुण्यस्मरणा निमित्त व शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्रह्मवृंद संस्था संचलित महर्षी याज्ञवल्क्य वेदपाठशाळा वर्धापन दिनानिमित्त ह.भ.प चैतन्य महाराज देगलूरकर यांचे प्रवचन संपन्न झाले.

     या प्रवचनामध्ये ह.भ.प चैतन्य महाराज देगलूरकर यांनी ज्ञानेश्वरीमधील गुरु या शब्दाबद्दल वर्णन करताना आयुष्यामध्ये चांगला गुरु मिळणे हे भाग्य लागते आणि तो गुरु कसा ओळखावा याचे अनेक दाखले दिले. ज्ञानेश्वरांनी सांगितलेली गुरू संकल्पना व त्यांनी सांगितलेल्या मार्गाचा जो आपल्या जीवनामध्ये आदर्श घालतो तोच योग्य मार्ग प्राप्त करू शकतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरूला महत्त्वाचे स्थान असून उत्तम गुरु जो ओळखतो व त्यांची सेवा करून ज्ञानर्जन संपादीत करतो आणि आपल्या आयुष्याला कलाटणी देऊन विविध कलागुणांनी स्वतःचे जीवन विकसित करतो. मानवाच्या आयुष्यात सद्गुरुला अत्यंत महत्त्वाचे स्थान असून भगवानशास्त्री धारूरकर यांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक शिष्य घडविले आणि त्या शिष्यांनी देखील त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालून अनेक उच्चपद पादाक्रांत करून आपले जीवन सार्थकी लावले.ह.भ.प चैतन्य महाराज देगलूरकर यांनी भगवानशास्त्री धारूरकर यांच्या जीवनामधील अनेक दाखले तसेच जुने जाणकार ज्यांनी त्यांच्याबद्दल लिहिलेले आहे, त्याचे अनेक दाखले श्रोत्यांना दिले. तसेच शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्रह्मवृंद संस्था ही शतक महोत्सवी संस्था असून या संस्थेच्या महर्षी याज्ञवल्क्य वेदपाठशाळेच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी शुभेच्छा दिल्या. "वेदोsखिलो धर्मो रक्षति" या संस्कृत वचनाप्रमाणे वेद रक्षण करणे ही काळाची गरज असून वेदांचा सर्व ठिकाणी अभ्यास होणे गरजेचे आहे आणि वेदांमधील तत्त्वज्ञान लोकांनी जाणलं पाहिजे असाही त्यांनी उल्लेख केला.पंडितप्राण भगवानशास्त्री धारुरकर यांची वेदावरील निष्ठा आणि संस्था संचलित महर्षी याज्ञवल्क्य वेदपाठशाळा हे खरोखरच स्तुत्य असून वेद रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे असे त्यांनी आपल्या प्रवचनांमधून कथन केले. प्रस्तुत प्रवचनाची सुरुवात नाम गजराने झाली.

 या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष वेदमुर्ती विद्याधर वांगीकर, कार्याध्यक्ष गजानन बिडकर, चिटणीस प्रकाश देवडीकर ,संस्थेचे सर्व संचालक व समाजातील सर्व समाज बांधव, वारकरी भाविक या कार्यक्रमाला उपस्थित होते. सदर कार्यक्रम हा ऑफलाईन व ऑनलाईन माध्यमाने संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: