हायलाइट्स:
- फर्निचर कारागिराला तीन दिवस कोंडले
- हत्या की आत्महत्या? तपास सुरू
- आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
याप्रकरणी सदर ठेकेदार पुनालाल चौधरी याच्या नातेवाईकांनी त्याची हत्या करून मृतदेह टांगून ठेवल्याचा आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. या घटनेनंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचं कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी सांगितलं.
तिसगाव नाक्यावरील फिटनेस एम्पायर जिममधील फर्निचरचे काम करण्यासाठी मालक वैभव परब याने पुनालाल चौधरी याला १ लाख रुपये दिले होते. मात्र दिलेल्या वेळेत काम पूर्ण न झाल्याने संतापलेल्या वैभव याने काम करण्यासाठी आलेल्या रमेश, गोगाराम आणि चोलाराम या पुनाराम यांच्या तिन्ही कामगारांना १८ ऑक्टोबर रोजी जिममध्ये कोंडून ठेवलं आणि जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत शटर उघडणार नाही, असं सांगितलं. १९ ऑक्टोबरला पुनाराम हे फर्निचरचे उरलेले सामान घेऊन परतताच त्यालाही या तीन कामगाराबरोबर वैभव याने जिममध्ये कोंडून ठेवलं. तसंच बेदम मारहाण करत काम पूर्ण न केल्यास दिलेले पैसे परत कर अशी धमकी दिली.
यामुळे घाबरलेल्या पुनाराम याने तिन्ही कामगारांना बाथरूमच्या खिडकीतून बाहेर पाठवलं आणि स्वत: जिममध्ये काम करत थांबला होता. मात्र २२ ऑक्टोबर रोजी पुनाराम याने जिममधील पंख्याला गळफास घेत आत्महत्या केल्याचं पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना सांगितलं. मात्र वैभव याने केलेल्या मारहाणीमुळे आणि दिलेल्या त्रासामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने शनिवार संध्याकाळपर्यत मृतदेह रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आला होता.
दरम्यान, या प्रकरणी जिममालक वैभव परब याच्याविरोधात आत्महत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी सांगितलं आहे.