हायलाइट्स:
- परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा सापडला?
- चौकशी आयोगासमोर सादर केलेल्या कागदपत्रांमुळं संशय बळावला
- परमबीर सिंग चंदीगडमध्ये असल्याची शक्यता
अँटिलिया स्फोटक प्रकरणानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून हकालपट्टी झालेल्या परमबीर सिंग यांनी काही दिवसांतच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप केले होते. त्यांच्या आरोपांमुळं राज्यात खळबळ उडाली. राजकारण तापलं. परिणामी अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र, त्यानंतर परमबीर सिंग यांच्यावरही खंडणीचे आरोप झाले. त्यांच्यावर मुंबई, ठाण्यासह अन्य ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. एका तक्रारीनंतर अॅट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळं त्यांना अटक होण्याची शक्यता होती. त्या भीतीनं ते गायब झाले. न्यायालयीन सुनावणीसाठी देखील परमबीर हजर न राहिल्यामुळं ते विदेशात पळून गेल्याची चर्चा मध्यंतरीच्या काळात होती. मात्र, आता वेगळीच माहिती समोर येत आहे.
वाचा: ‘अर्णब गोस्वामींच्या व्हॉट्सअॅप चॅटचं काय झालं? देशाला कळेल का?’
खंडणी वसुलीच्या प्रकरणात चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं निवृत्त न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चांदिवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय आयोगाची स्थापना केली आहे. ज्येष्ठ वकील अभिनव चंद्रचूड व आसिफ लॅम्पवाला यांच्या माध्यमातून त्यांनी चांदिवाल आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. सोबत मुखत्यारपत्र जोडण्यात आलं आहे. हे कागदपत्र चंदिगडमध्ये बनविल्याचं समोर आलं आहे. परमबीर सिंग यांच्या वतीनं महेश पांचाळ हा व्यक्ती आयोगासमोर हजर राहील, असं त्यात नमूद करण्यात आलं आहे. अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राच्या व्यतिरिक्त आयोगापुढं सादर करण्यासाठी माझ्याकडं दुसरं काहीही नाही, असं त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे.
वाचा: ‘अर्णब गोस्वामींच्या व्हॉट्सअॅप चॅटचं काय झालं? देशाला कळेल का?’