हायलाइट्स:
- मंत्री नवाब मलिक यांना धमकीचा फोन.
- समीर वानखेडे यांचे नाव घेत दिली धमकी.
- तक्रारीनंतर मलिक यांची सुरक्षा वाढवली.
वाचा: समीर वानखेडे यांना पुन्हा नवाब मलिक यांचे आव्हान; ‘त्या’ दाव्यावर ठाम
मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण देशभरात गाजत आहे. एनसीबीने कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकत अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना अटक केली होती. त्यानंतर याप्रकरणात आतापर्यंत एकूण २० जणांना अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण कारवाईवरच नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं व ही कारवाई फेक असल्याचा आरोप केला. त्यानंतर मलिक हे सातत्याने एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांना लक्ष्य करत आहेत. वानखेडे ही बोगस व्यक्ती आहे. सेलिब्रिटींना भीती घालून ते भाजपसाठी वसुली करत आहेत. त्याचे सगळे पुरावे मी देणार आहे. येत्या वर्षभरात त्यांची नोकरी घालवल्याशिवाय आणि त्यांना तुरुंगात पाठवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, अशा इशारा मलिक यांनी काल दिला होता. त्यानंतर आज मलिक यांना धमकीचा फोन आला आहे. याबाबत त्यांनी तक्रारही दिली आहे.
वाचा:बॉलिवूडला मुंबईबाहेर नेऊ देणार नाही; अजितदादांचा योगींना सूचक इशारा
नवाब मलिक यांना आज सकाळी सात वाजता एक फोन आला. हा फोन मलिक यांच्या सुरक्षा रक्षकाने घेतला. समोरच्या व्यक्तीने ओळख न सांगता मलिक यांना धमकावले. ‘समीर वानखेडे चांगले काम करत आहेत. त्यांच्याविरोधात बोलणं लगेच बंद करा, अन्यथा तुम्हाला महागात पडेल’, अशी धमकी देऊन या व्यक्तीने फोन ठेवला. नंतर पडताळणी केली असता हा फोन राजस्थानमधून आल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत मलिक यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर मलिक यांच्या सुरक्षेत तातडीने वाढ करण्यात आली आहे. फोनबाबत पोलिसांचा तपासही सुरू झाला आहे.
दरम्यान, मलिक यांनी याआधीही धमकीच्या फोनचा दावा केलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून हे प्रकार सुरू असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
वाचा: ‘समीर वानखेडेंची नोकरी घालवणार, त्यांना तुरुंगात टाकल्याशिवाय थांबणार नाही’