Dilip Walse Patil: महाराष्ट्र सरकार समीर वानखेडे यांची चौकशी करणार का?; गृहमंत्री म्हणाले…


हायलाइट्स:

  • वानखेडे यांना तुरुंगात पाठवण्याचा मलिकांचा इशारा.
  • गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची सावध प्रतिक्रिया.
  • वानखेडे केंद्राच्या सेवेत, आम्ही कशी चौकशी करणार?

मुंबई: मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने केलेल्या कारवाईनंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे सातत्याने एनसीबी आणि एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. गुरुवारी पुण्यातील मावळ येथे एका कार्यक्रमात बोलताना मलिक यांनी थेट वानखेडे यांना इशाराच दिला. एका वर्षाच्या आत तुमची नोकरी घालवणार आणि तुमचा तुरुंगवास निश्चित आहे, असे मलिक म्हणाले. या विधानावरून मोठी खळबळ उडाली असतानाच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. ( Dilip Walse Patil On Sameer Wankhede Probe )

वाचा: समीर वानखेडे यांना पुन्हा नवाब मलिक यांचे आव्हान; ‘त्या’ दाव्यावर ठाम

नवाब मलिक यांच्या विधानाकडे लक्ष वेधत महाराष्ट्र सरकार समीर वानखेडे यांची चौकशी करणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता दिलीप वळसे पाटील यांनी तशी शक्यता नाकारली. ‘समीर वानखेडे हो केंद्र शासनाच्या सेवेत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने त्यांची चौकशी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’, असे वळसे पाटील यांनी सांगितले. ‘नवाब मलिक यांनी काही विधान केले असेल तर त्याबाबत मला अद्याप काहीही माहिती नाही तसेच त्यांनी असा कोणताही पुरावा माझ्याकडे अद्याप दिलेला नाही. मी त्यांच्याकडून माहिती घेईन पण आतातरी माझ्याकडे कोणतीच माहिती नाही’, असेही वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

वाचा: ‘समीर वानखेडेंची नोकरी घालवणार, त्यांना तुरुंगात टाकल्याशिवाय थांबणार नाही’

काय म्हणाले होते नवाब मलिक?

नवाब मलिक हे सातत्याने समीर वानखेडे यांना लक्ष्य करत आहेत. गुरुवारी मलिक यांनी प्रथम पत्रकार परिषद घेऊन वानखेडे व त्यांच्या बहिणीवर गंभीर आरोप केले. त्यानंतर पुण्यातील मावळ येथे एका कार्यक्रमात बोलताना वानखेडे यांना तुरुंगात पाठवण्याचा इशारा दिला. ‘समीर वानखेडे हा बोगस माणूस आहे. त्यांचे वडील, त्यांच्या घरातले सगळेच बोगस आहेत. वानखेडे यांनी एनसीबीच्या माध्यमातून भाजपवाल्यांसाठी हजारो कोटींच्या वसुलीचा धंदा चालवला आहे. या सगळ्याचे पुरावे मी येत्या काळात देणार आहे. हे पुरावे दिल्यानंतर एक दिवसही वानखेडे नोकरीत राहू शकणार नाहीत. माझ्या जावयाला अटक केल्यानंतर हेच वानखेडे मला निरोप पाठवतात. माझ्यावर वरून दबाव आहे, असे सांगतात. तुमच्यावर दबाव आहे तर मग दबाव टाकणारा बाप कोण ते एकदा सांगाच. मी तुमच्या बापाला घाबरत नाही. एका वर्षाच्या आत तुमची नोकरी घालवणार आहे आणि तुम्हाला तुरुंगात पाठवणार आहे. त्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही’, असा इशारा मलिक यांनी दिला. मलिक यांनी वानखेडे यांचा एकेरी उल्लेख करत हे आव्हान दिले.

वाचा: समीर वानखेडे यांचा नवाब मलिकांवर पलटवार; सर्व आरोप फेटाळले!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: