हायलाइट्स:
- भंडारा जिल्ह्यात सेंट्रल बँकेच्या आसगाव शाखेत अफरातफर
- बँकेचा कर्मचारी असल्याचं सांगून दीड कोटी वळवले
- शाखा व्यवस्थापकासह पाच जणांवर गुन्हा दाखल
आरोपी प्रदीप पडोळे याची सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत बाचेवाळी येथे २०१८ पासून नियुक्ती करण्यात आली होती. नियुक्ती झाल्यापासून त्याने बँकेच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ग्राहकांचे बायोमॅट्रिक मशिनद्वारे बँकेत पैसे काढण्याचे व जमा करण्याचे काम सुरू केले होते. त्याच्या आर्थिक व्यवहाराकरीता बँक शाखेने स्वतंत्र्य ओडी क्रमांक बनवून दिला होता. दरम्यान बँकेच्या एका खातेदाराने आपल्या खात्यातून २ लाख ४९ हजार रुपयाची रक्कम काढण्यात आल्याची तक्रार केली होती. खातेदाराच्या तक्रारीवरून याबाबत सखोल चौकशी व लेखापरीक्षण केले असता आरोपी प्रमोद याने १ कोटी ५० लाख रुपयांची अफरातफर केल्याचं समोर आलं.
वाचा: समीर वानखेडेंवर वसुलीचे आरोप; नवाब मलिक यांनी ‘ते’ फोटो केले शेअर
बँकेत बसून स्वत:ला बँक कर्मचारी असल्याचं भासवून ग्राहकांकडून पैसे जमा करणं, एकाच वेळी अनेक विथड्रॉवल फॉर्मवर ग्राहकांच्या सह्या व अंगठे घेऊन ठेवणं, या फार्मच्या आधारे नंतर ग्राहकांच्या खात्यावरील पैसे स्वत:च्या खात्यावर ऑनलाइन पद्धतीनं वळते करणं तसंच, बायोमेट्रिक मशिनचा दुरुपयोग करून बँक ग्राहकांच्या अंगठ्याचा गैरवापर करीत आपल्या खात्यावर पैसे वळते करणं, याशिवाय आपल्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीनं वळविलेले पैसे खोट्या फिक्स डिपॉझिटच्या पावत्या तयार करून खोटे बीसी कोडचे शिक्के मारून ग्राहकांची फसवणूक करण्याचा प्रकार प्रमोद पडोळे या महाभागाकडून करण्यात आला. या सर्व प्रकारावर नियत्रंण ठेवण्याचे अधिकार असताना बँक कर्मचारी उमेश कापगते, आशिष आटे, कमलाकर धार्मिक व दुर्गेश भोंगाडे यांनी कर्तव्यात कचुराई केल्याचं निर्दशनास आलं. त्यामुळं सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक हर्षकुमार हरिदास जामगंडे (३५) यांनी पवनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भांदविच्या कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४०९, ३४ माहिती तंत्रज्ञान अधिनियन्वाय सह कलम ६६ (ड) अंतर्गत गुन्हा दाखल केेला आहे.
वाचा: आर्यन खानला तातडीचा दिलासा नाही! २६ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत राहावं लागणार