हायलाइट्स:
- एनसीबीविरोधात नवाब मलिक आणखी आक्रमक
- समीर वानखेडे यांना दिलं खुलं आव्हान
- वानखेडेंना तुरुंगात टाकल्याशिवाय थांबणार नाही – मलिक
अंमली पदार्थाच्या व्यापारात सामील असल्याच्या आरोपांवरून सुमारे नऊ महिन्यांपूर्वी नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीनं अटक केली होती. साडेआठ महिने तुरुंगात राहिल्यावर त्यांना अखेर जामीन मिळाला. समीर खान यांना बोगस प्रकरणात अडकवण्यात आल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. माझ्या जावयावरचे आरोप कोर्टात सिद्धच होऊ शकले नाहीत. त्याच्यावर गुन्हाच दाखल होऊ शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. मात्र, मला त्रास देण्यासाठी व राज्यातील महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी माझ्या जावयाला जामीन मिळू दिला नाही, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. ‘हे सगळं कटकारस्थान भाजपवाल्यांचं आहे. नटनट्यांवर बोगस गुन्हे दाखल करून हजारो कोटींची वसुली करण्याचा धंदा सुरू आहे. आम्ही हे सिद्ध केल्याशिवाय थांबणार नाही,’ असं मलिक म्हणाले.
वाचा: किरीट सोमय्यांच्या आरोपांना अजित पवारांचं ‘दादा स्टाइल’ उत्तर, म्हणाले…
समीर वानखेडे यांच्यावर मलिक यांनी एकेरी भाषेत टीका केली. ‘हा बोगस माणूस आहे. त्यांच्या घरातले सगळे लोक बोगस आहेत. त्यांच्या विरोधात पुरावे सादर केल्यानंतर एक दिवसही ते नोकरीत राहू शकणार नाहीत. ते तुरुंगात जाणार हे निश्चित आहे,’ असं मलिक म्हणाले. ‘नवाब मलिकच्या जावयाला तुरुंगात टाकलं असं त्यांना वाटत असेल, पण मी शांत बसणार नाही. माझ्या जावयाला अटक झाल्यानंतर हेच वानखेडे मला निरोप पाठवत होते. माझ्यावर दबाव आहे. तुमच्यावर दबाव आहे तर तो दबाव टाकणारा तुमचा बाप कोण आहे, त्याचं उत्तर आम्हाला द्या. तुमचे कितीही बाप दबाव टाकत असतील तरी नवाब मलिक कुणाच्या बापाला घाबरणार नाही आणि तुम्हाला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही,’ असं मलिक यांनी ठणकावून सांगितलं.
वाचा: समीर वानखेडेंवर वसुलीचे आरोप; नवाब मलिक यांनी केले ‘ते’ फोटो शेअर