हायलाइट्स:
- आर्यन खान याचा जामीन अर्ज फेटाळला
- ‘ड्रग्ज घेतले नाहीत, तर नशेत कसा असेल’
- एनसीबीच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह
ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आर्यन खानसहीत इतर आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयासमोर जामीन याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयानं या याचिका फेटाळून लावल्या आहेत.
यावर प्रतिकिया देताना ‘आर्यन खान याचा जामीन अर्ज फेटाळला… नवीन न्यायशास्त्र… मी ड्रग्ज घेतले नाहीत, तर मी नशेत कसा असेल… माझ्या शेजारी बसलेल्या माझ्या मित्रानं ड्रग्ज घेतलं असेल तरीदेखील माझ्यावर ड्रग्ज घेतल्याचा गुन्हा दाखल केला जाईल?’ असं ट्विट करत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) कारवाईवर कपिल सिब्बल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
कपिल सिब्बल यांच्या या ट्विटल कार्ति चिदंबरम यांनीही दुजोरा दिला आहे. ‘या तर्कानं तुम्ही कुणाशीही जवळ असाल तर त्याच्याशी निगडीत प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हालाही जबाबदार धरलं जाऊ शकतं’, असं कार्ति चिदंबरम यांनी म्हटलंय.
यापूर्वीही १५ ऑक्टोबर रोजी कपिल सिब्बल यांनी एनसीबीच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ‘ड्रग्जचा वापर किंवा जवळ बाळगल्याचा कोणताही पुरावा नाही मात्र, निर्दोष सिद्ध होईपर्यंत दोषी… आर्यन खान प्रकरणात एनसीबीच्या चौकशीत कायद्याची नवीन प्रणाली दिसली’ असं सिब्बल यांनी म्हटलं होतं.
इतकंच नाही, तर केवळ उत्तर प्रदेशात लखीमपूर खीरीमध्ये घडलेल्या हिंसाचार प्रकरणात मंत्रीपुत्र आरोपी आशिष मिश्रावरून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचं सिब्बल यांनी म्हटलं होतं.
मंत्रीपुत्र आशिष मिश्रा प्रकरण
गेल्या ३ ऑक्टोबर रोजी एकीकडे लखीमपूर खीरीमध्ये गाडीखाली चिरडून ठार करण्यात आलं होतं. यानंतर संतापलेल्या आंदोलकांनी केलेल्या मारहाणीत आणखीन चार जण मारले गेले होते. या प्रकरणात केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा हा मुख्य आरोपी आहे. हत्येच्या आरोपानंतरही गेल्या शनिवारी दोन नोटिशीनंतर आशिष मिश्रा याला अटक करण्यात आली.
आर्यन खान प्रकरण
तर दुसरीकडे याच दिवशी ३ ऑक्टोबर रोजी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा २३ वर्षीय मुलगा आर्यन खान याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं अटक केली होती. विशेष म्हणजे, एनसीबीला आर्यन खानकडे अमली पदार्थ असल्याचे किंवा त्यानं अमली पदार्थाचं सेवन केल्याचे कोणतेही पुरावे सापडले नव्हते.