नगरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; घरावर छापा टाकल्यानंतर झाला धक्कादायक खुलासा


हायलाइट्स:

  • सुगंधित तंबाखू आणि सुगंधित सुपारी जप्त
  • मावा तयार करण्यासाठी वापरला जात होता माल
  • पोलिसांनी घरावर छापा टाकल्यानंतर झाला खुलासा

अहमदनगर : बंदी असतानाही सुगंधित तंबाखू आणि सुपारी यांचा साठा तसंच विक्री करणाऱ्यांविरुद्ध नगरच्या पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. गुरूवारी केडगावमधील एका घरावर छापा घालून १२ पोती सुगंधित तंबाखू आणि ३० किलो सुगंधित सुपारी जप्त करण्यात आली. हा माल मावा तयार करण्यासाठी वापरण्यात येतो. यासाठीचे यंत्रही जप्त करण्यात आलं आहे.

नगरमध्ये अनेक टपऱ्यांवर हा तंबाखूजन्य मावा विकला जात असून गुटख्याला पर्याय म्हणून त्याचे सेवन केले जात असल्याचे दिसून येते.

किरीट सोमय्यांच्या आरोपांना अजित पवारांचं ‘दादा स्टाइल’ उत्तर

बंदी असूनही माव्याचीही नगरमध्ये विक्री केली जाते. अधून मधून पोलीस त्यावरही कारवाई करतात. आता अशीच मोहीम सुगंधित तंबाखूविरुद्ध सुरू आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे यांच्या पथकाने गुरूवारी केडगाव भागातील एका घरावर छापा टाकला. तेथून तंबाखू आणि सुपारी जप्त करण्यात आली. सुमारे सव्वा सहा लाख रुपयांचा हा मुद्देमाल आहे.

या प्रकरणी अक्षय बापू राहिंज (वय २८, रा. भूषणनगर, केडगाव) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून सुगंधित तंबाखू, सुपारी तसंच मावा तयार करण्याचे यंत्रही जप्त करण्यात आलं आहे. पोलीस कर्मचारी योगेश भिंगारदिवे, सागर पालवे, भारत इंगळे, सुजय हिवाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

नगर शहरात मावा किंवा खर्रा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या नशाजन्य पदार्थाचे सेवन केले जाते. भल्या सकाळी टपरीसमोर थांबून तरुण पिढी याची खरेदी करताना दिसून येते. टपरीवरून तंबाखू, सुपारी आणि अन्य पदार्थांचे मिश्रण करून त्यापासून हा मावा तयार केला जात असे. मात्र, त्यासाठीही आता यंत्र उपलब्ध झालं आहे. या यंत्राच्या सहाय्याने मिश्रण करून विकले जाते. त्यात टपरीचालक ग्राहकांच्या मागणी आणि आवडीनुसार बदल करून विकतात.

शहरात या व्यवसायातून मोठी उलाढाल होत असल्याचं सांगण्यात येते. त्यामुळेच सुरुवातीला केवळ टपऱ्यांपुरता मर्यादित असलेला हा धंदा आता मोठ्या प्रमाणावर आणि यंत्रणाच्या सहाय्याने सुरू झाल्याचे दिसून येते. पोलिसांनी कारवाईत सातत्य ठेवले नाही, तर तो सुरूच राहून तरुण पिढी व्यसनाधीन होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: