केंद्रीय कर्मचाऱ्यांना आज मिळणार दिवाळी भेट; ३ टक्क्यांनी वाढू शकतो डीए


नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांना आज दिवाळी भेट मिळू शकते. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज होत असून त्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए) वाढवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीसाठी म्हणजेच जुलै ते डिसेंबर पर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात डीए ३१ टक्क्यांपर्यंत वाढेल. सध्या तो २८ टक्के आहे.

जून २०२१ साठी महागाई भत्ता अद्याप निश्चित झालेला नाही, पण जानेवारी ते मे २०२१ च्या एआयसीपीआयच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट आहे की, यात ३ टक्क्यांची वाढ होऊ शकते. महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढवल्यानंतर तो ३१ टक्के होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याच महिन्यात याबाबतची घोषणा केली जाऊ शकते. महागाई भत्ता वाढवून सरकार दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आनंदाची बातमी देऊ शकते.

वर्षातून दोनदा वाढतो डीए
जानेवारी २०२० मध्ये महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्यात आली. त्यानंतर जून २०२० मध्ये त्यात ३ टक्के आणि जानेवारी २०२१ मध्ये ४ टक्क्यांनी वाढ झाली. पण, कोरोना महामारीमुळे सरकारने जानेवारी २०२० ते जून २०२१ पर्यंत तीन महागाई भत्त्यातील वाढ गोठवली होती. जुलैमध्ये सरकारने हे निर्बंध हटवले आणि कर्मचाऱ्यांना २८ टक्के दराने महागाई भत्ता देण्यात आला आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवला जातो. जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन १८,००० रुपये असेल, तर त्याला सध्या ५,०४० रुपये महागाई भत्ता मिळत आहे. ही रक्कम मूळ पगाराच्या २८% आहे. जर डीए मध्ये ३ टक्क्यांनी वाढ केली, तर कर्मचाऱ्याला ५,५८० रुपये डीए म्हणून मिळतील. म्हणजेच वेतनात ५४० रुपयांची वाढ होईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: