फिलाडेल्फिया : अमेरिकेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका धावत्या मेट्रो रेल्वेमध्ये एका महिलेवर बलात्कार झाला असल्याचे समोर आले आहे. या महिलेवर बलात्कार सुरू असताना इतर प्रवाशांनी तिला वाचवण्याचे प्रयत्न केले नाही. याउलट काही प्रवाशांकडून बलात्काराचे व्हिडिओ रेकोर्ड केले जात होते. एकाही प्रवाशाने ९११ या क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधला नाही. ही घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.
बुधवारी रात्री उत्तर फिलाडेल्फिया स्थानकावर महिला आणि एक पुरुष रेल्वेत दाखल झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी ३५ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. आरोपीने ४० मिनिटाच्या प्रवासात पीडित महिलेचा विनयभंग आणि बलात्कार केला असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. हा आरोपी बेघर असल्याची माहिती समोर आली आहे.