हायलाइट्स:
- निवृत्त एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या
- नगरमधील पोलीस ठाण्याच्या स्वच्छतागृहात आढळला मृतदेह
- दोन-तीन दिवस पोलिसांना थांगपत्ताही नव्हता!
बुधवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला. शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या आवारात मागील बाजूला स्वच्छतागृह आहे. त्याचा फारसा वापर केला जात नाही. तेथून दुर्गंधी येत असल्याने पोलिसांनी जाऊन पाहिले. तेव्हा तेथील बाथरुमच्या शॉवरला लुंगीच्या सहाय्याने गळफास घेतल्याच्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपधीक्षक अजित पाटील, पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह खाली काढून तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला.
वाचा: परमबीर सिंग बेपत्ता; राज्य सरकारनं कोर्टात मांडली ‘ही’ भूमिका
पोलिसांना घटनास्थळी एक बॅग आढळून आली. त्यामध्ये काही कपडे, एसटीची तिकिटे, ड्रायव्हिंग लायसेन्स अशी कागदपत्रे होती. त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला. ड्रायव्हिंग लायसेन्सवरून संबंधित व्यक्तीचे नाव ज्ञानेश्वर तुकाराम मराठे (वय ६२, रा. फलटण, जि. सातारा) असे असल्याचे निष्पन्न झाले. याशिवाय मराठे एसटीचे सेवानिवृत्त कर्मचारी असल्याचेही आढळून आले. त्यांच्याकडे आढळून आलेल्या तिकिटानुसार ते १६ तारखेला नगरला आले होते. मात्र, ते कशासाठी नगरला आले होते, त्यांनी कोणत्या कारणावरून आत्महत्या केली आणि ते कोतवाली पोलीस ठाण्याचा आवारातील या स्वच्छतागृहात का आणि कसे गेले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. कोतवाली पोलिस ठाण्याच्या आवारातील सीसीटीव्हीच्या मदतीने यासंबंधीचा तपास सुरू आहे. याशिवाय पोलिसांनी फलटण येथे त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क केला असून ते नगरला यायला निघाले आहेत. त्यानंतरच घटनेचा अधिक उलगडा होऊ शकेल, असे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी सुसाईट नोट आढळून आलेली नाही. असे असले तरी पोलिस ठाण्याच्या आवारातील स्वच्छतागृहात बाहेरचा माणूस जातो, तेथे आत्महत्या करतो आणि दोन तीन दिवस पोलिसांना याचा थांगपत्ताही लागत नाही, ही गोष्ट गंभीर मानली जात आहे.
वाचा: NDPS कोर्टानं जामीन नाकारताच आर्यन खानच्या वकिलांची हायकोर्टात जाण्यासाठी धावाधाव