हायलाइट्स:
- राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
- भाजप नेत्यांवर साधला निशाणा
- प्रवीण दरेकरांनी दिले उत्तर
साताऱ्यातील एका सभेत बोलताना शशिकांत शिंदे यांनी भाजपबाबत एक गौप्यस्फोट केला होता. भाजपचं माझ्यावर एवढं प्रेम होतं, ते आजही माझ्यावर तेवढंच प्रेम करतात. मला वाटतं तेव्हा १०० कोटी रुपये घेतले असते तर बरं झालं असतं. पण त्यांना माहिती आहे की मी शरद पवार यांचा निष्ठावंत पाईक आहे. मेलो तरी शरद पवारांना सोडणारा नाही, असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं होतं. आता शशिकांत शिंदेंच्या या दाव्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘शशिकांत शिंदेंना भाजप १०० कोटींची ऑफर देईल, असं मला वाटत नाही, असं एका वाक्यात उत्तर देत दरेकरांनी हा विषय इथेच थांबवला आहे. तसंच, प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्ये केली जात आहेत, असं मला वाटतं,’ असंही प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
वाचाः ‘ठाकरे सरकार जागरूक राहिल्यानेच राज्यात करोना आटोक्यात’
शशिकांत शिंदे काय म्हणाले?
भाजपला ईडी आणि बाकी सीडीला पळवून लावणारे कोणी कार्यकर्ते असतील तर ते आमच्यासारखे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. मध्यंतरी किरीट सोमय्या येथे आले होते. मी अजित पवार यांना सांगितलं होतं मला परवानगी द्या. त्यांना एकदा बघून घेतो. पण अजित पवार यांनी मला नको म्हणून सांगितलं. आपण परिणामांचा विचार करत नाही. आपण ईडीच्या बापाला घाबरत नाही आणि आयकर विभागाच्या बापालाही घाबरत नाही,’ असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.