मागील आठवड्यापासून बांगलादेशमध्ये हिंदू समुदायाला लक्ष्य केले जात आहे. नवरात्रौत्सवात दुर्गा मंडप, मंदिरांवर धर्मांधांनी हल्ले केले. सोशल मीडियावर कथित ईश निंदा केल्याच्या दाव्यावरून कोमिल्लामध्ये पहिल्यांदा हिंसाचार झाला. त्यानंतर बांगलादेशमध्ये ठिकठिकाणी हिंसाचार झाला. रविवारीदेखील हिंदू समुदायाच्या २० घरांना आग लावण्यात आली. पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
सोशल मीडियावर विश्वास नको
पंतप्रधान शेख हसीना यांनी सोशल मीडियावर कोणत्याही अधिकृत माहितीशिवाय विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. सोशल मीडिावर असलेल्या पोस्टबाबतची सत्यता पडताळण्याचेही आवाहन त्यांनी नागरिकांना केले. हिंसाचाराच्या अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी गृह मंत्रालयाला सतर्क राहण्याची सूचना त्यांनी दिली.
४५० जणांवर कारवाई
पोलिसांनी हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत ४५० जणांना अटक केली आहे. आणखी संशयितांना अटक करण्यासाठी मोहीम सुरू आहे. हिंसाचार प्रकरणी एकूण ७१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हिंदू समुदायावर होत असलेले हल्ले रोखण्यासाठी पोलिसांसह अर्धसैनिक दल तैनात करण्यात आले आहेत. बांगलादेशमधील विविध संघटना, पक्षांनी या हिंसाचाराचा निषेध केला आहे. सत्ताधारी अवामी लीग पार्टीने देशभरात सामाजिक एकोप्यासाठी रॅलीचे आयोजन केले आहे. बांगलादेशमधील धार्मिक एकोपा कायम राखण्याचे आवाहन अनेकांनी केले आहे.