हायलाइट्स:
- बंद घरे आणि किराणा दुकानांचे कुलूप तोडून घरफोड्या
- दोन जणांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं
- आरोपींनी १२ ठाण्यांच्या हद्दीत तब्बल २८ घरफोड्या केल्याची माहिती
आरोपींनी वर्षभरात ग्रामीण औरंगाबादेतील १२ ठाण्यांच्या हद्दीत तब्बल २८ घरफोड्या केल्याची माहिती पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी मंगळवारी (१९ ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत दिली. या टोळीने वडोद बाजार येथे एकाच रात्री तब्बल आठ घरफोड्या केल्याचा प्रकारही समोर आला आहे.
काकासाहेब भिकन चव्हाण (रा. किनगांव ता. फुलंब्री) यांनी फुलंब्री पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, १० ऑक्टोबरच्या मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या घराच्या वरच्या मजल्याचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याची पोत, नेकलेस, मनी मंगळसूत्र व चांदीची चैन तसंच त्याच गावातील दत्तात्रय यादवराव चव्हाण, देवनाथ भिकाजी सोनवणे, जिजाराम सांडू चव्हाण यांचे देखील घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख असा एकूण ९९ हजार ५०० रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस हे सदर गुन्ह्याचा तपास करत असताना त्यांना सदर गुन्हे हे संजय शिंदे आणि रामा पवार यांनी अन्य साथीदारांसह केल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी भोकरदन येथील एका हॉटेलवरून या दोघांना ताब्यात घेतलं. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी चार साथीदारांसह घरफोड्या केल्याची कबुली दिली.
दोघांच्या ताब्यातून गुन्ह्यांतील ३ लाख ३० हजार ४३ रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख १४ हजार रुपये, दोन मोबाईल, घरफोडीत वापरण्यात आलेले लोखंडी कटर व छोटी लोखंडी पहार असा एकूण ३ लाख ६३ हजार ४३ रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला. ही कामगिरी पोलीस अधीक्षक निमित गोयल, अपर पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, उपनिरीक्षक विजय जाधव, प्रदीप दूबे, जमादार नामदेव सिरसाठ, संजय देवरे, विठ्ठल राख, बालू पाथ्रीकर, श्रीमंत भालेराव, किरण गोरे, पोलीस नाईक वाल्मीक निकम, राहूल पगारे, शेख नदीम, शेख अख्तर, शिपाई बाबासाहेब नवले, ज्ञानेश्वर मेटे, योगेश तरमाळे, जिवन घोलप यांनी केली आहे.