हिंसाचार प्रकरणी ५२ अटकेत
हिंसेप्रकरणी ५२ संशयितांना अटक करण्यात आली असून, आणखी हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. सुमारे चारशे जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिस ज्या ठिकाणी उभे होते, ती ठिकाणे सोडून हल्लेखोरांनी इतर ठिकाणे जाळली. अग्निशामक दलाने सोमवारी पहाटेपर्यंत आग आटोक्यात आणली.
दुर्गा पूजेदरम्यान ईशनिंदा केल्याच्या आरोपावरून बांगलादेशातील कोमिला, चांदपूर, चट्टोग्राम, बांदरबन, गाझीपूर, फेनी या ठिकाणी येथे तणाव आहे. हिंदू मंदिरांना त्यावरून लक्ष्य केले जात आहे. या हल्ल्यांप्रकणी आत्तापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी आणि गुरुवारी उसळलेल्या हिंसेत हाझीगंज येथे चार जणांचा मृत्यू झाला होता, तर नौखाली जिल्ह्यात एकाचा मृतदेह आढळून आला होता. बांगलादेशात राजधानी ढाक्यासह इतर अनेक ठिकाणी दोन्ही समुदायांचे नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. बांगलादेशातील हिंदू-बुद्धिस्ट-ख्रिस्ती एकता मंडळाने ७० पूजा मंडपांवर आणि मंदिरांवर हल्ले झाल्याचे सांगितले, तर चार भाविकांचा आत्तापर्यंत मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.
बंगाल सीमेवर दक्षता
पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशातील हिंसेचे पडसाद उमटू नयेत, यासाठी राज्य सरकारने सीमेवरील जिल्हा प्रशासनांना दक्ष राहण्यास सांगितले आहे. समाज माध्यमांवरील अफवांच्या आधारे सीमेवरील जिल्ह्यांमध्ये कोणी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास तो हाणून पाडा, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
‘हल्लेखोरांवर कारवाई करा’
कोलकता: बांगलादेशात दुर्गापूजा मंडपांवर हल्ला करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पश्चिम बंगालमधील नामवंत व्यक्तींनी केली आहे. शिक्षणतज्ज्ञ पवित्रा सरकार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्यूरो सदस्य महंमद सलीम, लेखक नवकुमार बसू, दिग्दर्शक कमलेश्वर मुखोपाध्याय आदींसह ६० जणांनी खुले पत्र प्रकाशित केले आहे. या पत्राद्वारे बांगलादेशातील शेख हसीना सरकारला आवाहन करण्यात आले आहे.