मृतांची संख्या ३५ वर
केरळमध्ये पूर आणि अतिवृष्टीमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३५ वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेसप्रणित विरोधी आघाडीने पिनराई विजयन सरकारवर आरोप केले असून, सरकारने वेळेवर कृती न केल्याचा दावा केला आहे. केरळमधील विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन यांनी, हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतरही राज्य सरकार कृती करण्यात का अपयशी ठरले, असा सवाल केला. मात्र सरकारने हे आरोप फेटाळले.
उत्तराखंड, उत्तर प्रदेशात पावसाचा अंदाज
दरम्यान, उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशात येत्या काही दिवसांत जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. ‘सध्या दोन कमी दाबाची क्षेत्रे तयार झाली आहेत. त्यापैकी एक मध्य प्रदेशच्या नैऋत्येकडील भागात असून, दुसरे क्षेत्र पश्चिम बंगालमध्ये आहे. याशिवाय पश्चिमेकडील वातावरणीय बदलांमुळेही पाऊस पडत आहे. अफगाणिस्तानकडील भागात झालेल्या वातावरणातील बदलांमुळे सोमवारी दिल्ली आणि नजीकच्या परिसरांत पाऊस झाला आहे,’ असे हवामानशास्त्र विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ नरेशकुमार यांनी सांगितले.