हायलाइट्स:
- भावाला नवरात्रीच्या कार्यक्रमातून काढल्याचा राग
- तरुणाला चाकू, लोखंडी रॉड व स्टीलच्या पट्ट्यांनी मारहाण
- आरोपींना अखेर पोलिसांनी केली अटक
या प्रकरणात अंगद रोहिदास काचेवाड (२७, रा. राधास्वामी कॉलनी) याने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, १५ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या पुतण्याचा अपघात झाला होता. त्यामुळे फिर्यादी व त्याचे नातेवाईक पुतण्यावर घाटी रुग्णालयात उपचार करुन त्याला घरी घेऊन जात होते. जखमी पुतण्या रिक्षाने घरी गेला, तर संतोष अलगुलवार याच्या दुचाकीवर फिर्यादी घरी जात होता.
रात्री एक वाजेच्या सुमारास टाऊन हॉल उड्डाणपुलावर पाठीमागून गणेश पांडवसह दुचाकीवर आलेल्या सहा ते सात जणांनी दुचाकी थांबव म्हणत फिर्यादीला लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यामुळे संतोषने दुचाकी थांबवली. त्यानंतर आरोपींनी ‘शुभम गायकवाड याला नवरात्रीच्या कार्यक्रमातून का काढले’ असं म्हणत फिर्यादीसह संतोषला लोखंडी रॉड व स्टीलच्या पट्ट्यांनी मारहाण केली. तसंच आरोपींपैकी एकाने फिर्यादीच्या हातावर वार करुन जखमी केले. गणेश व त्याच्या साथीदारांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गणेश लक्ष्मण पांडव (२२), शुभम बाळासाहेब गायकवाड (२३, दोघे रा. राधास्वामी कॉलनी, जटवाडा रोड हर्सुल), विशाल गीताकांत तासकर (२३), ऋषिकेश गीताकांत तासकर (१९, दोघे रा. जटवाडा रोड, हर्सूल) व रोहित जितेंद्र वाघ (१९, रा. सईदा कॉलनी, जटवाडा रोड हर्सुल) या आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.