हायलाइट्स:
- चंद्रकांत पाटलांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख
- राष्ट्रवादीसह शिवसेनेनं साधला निशाणा
- टीकेनंतर चंद्रकांत पाटलांची सारवासारव
‘सांगलीतील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना अनावधानाने माझ्याकडून पवारसाहेबांचा एकेरी उल्लेख झाला. पवारसाहेब आमचे विरोधक असले तरी माझ्या मनात त्यांच्याबद्दल अनादर नाही,’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा खुलासा केला आहे.
‘मुख्यमंत्री होताना ४० गोष्टी लिहिल्या आणि ३८ पूर्ण केल्या’
‘मी शरद पवार यांची स्तुती करताना बऱ्याचदा सांगतो, आम्हाला प्रमोद महाजनजी म्हणायचे की पवारसाहेबांनी मुख्यमंत्री होताना ४० गोष्टी लिहून ठेवल्या आणि नंतर त्यातील ३८ गोष्टी पूर्ण केल्या. त्यामुळे त्यांच्याबद्दल मला आदरच आहे. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा आणि पवारसाहेबांसारख्या महाराष्ट्राच्या विकासात योगदान असलेल्या ज्येष्ठ नेत्याचा अनादर करणं आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणि हिंदू धर्माने शिकवलं नाही,’ असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांचा एकेरी शब्दांत उल्लेख केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक शब्दांत पाटील यांच्यावर टीका केली होती. सत्ता गमावून नैराश्य आल्यानेच अशा प्रकारची वक्तव्य केली जात असल्याचा टोला रोहित पवार यांनी लगावला होता.