हायलाइट्स:
- खासदार भावना गवळी यांना ईडीचं दुसऱ्यांदा समन्स
- मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ईडीचं पुढचं पाऊल
- भावना गवळी यांच्या भूमिकेकडं लक्ष
वाशिमच्या खासदार असलेल्या भावना गवळी यांच्या बालाजी पार्टिकल बोर्ड कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ईडीनं गवळी यांच्याशी संबंधित असलेल्या यवतमाळ व वाशिम येथील पाच संस्थांवर याआधीच छापे टाकले आहेत. वाशिम-यवतमाळ येथे टाकलेल्या छाप्यांमध्ये ईडीनं अनेक कागदपत्रे जप्त केली होती. भावना गवळीशी संबंधित पाच संस्थांच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली होती. त्याशिवाय, गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेच्या कार्यालयातून ७ कोटी रुपये चोरीला गेल्याची तक्रार स्वत: गवळी यांनी केली होती. त्या तक्रारीनंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गवळी यांच्याविरोधात आरोपांची राळ उडवून दिली होती. तेव्हापासून ईडीच्या कारवाईला वेग आला आहे. गवळी यांचा निकटवर्तीय सईद खान याला अलीकडंच ईडीनं ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर आता ईडीनं गवळी यांना समन्स बजावलं आहे.
गवळी यांना २० ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. सईद खान याच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती ईडीला मिळाली असण्याची शक्यता आहे. त्याच आधारे गवळी यांना समन्स बजावलं गेलं असावं, असं सांगण्यात येतं. यापूर्वी ४ ऑक्टोबर रोजी देखील गवळी यांना समन्स बजावण्यात आलं होतं. आता दुसऱ्यांदा त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. या समन्सला भावना गवळी कसा प्रतिसाद देतात, याकडं आता लक्ष लागलं आहे.
हेही वाचा:
भाजपविरोधात फक्त शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांनी बोलायचं का?; आघाडीच्या मंत्र्यांवर राऊत संतापले