‘आणखी एका मंत्र्याच्या पापाचा घडा भरला’; भाजप नेत्याचा रोख कोणाकडे?


अहमदनगर : भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या महाविकास आघाडीतील मंत्री आणि नेत्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आणण्याचा इशारा देत आहेत. काही प्रकरणे त्यांनी समोर आणल्याने चौकशीही सुरू झालेली आहे. याच पद्धतीने भाजपचे नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही एका मंत्र्यांचे नाव न घेता भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.

‘नगर जिल्ह्यातील एका मंत्र्याच्या पापाचा घडा भरला असून कोणी किती महसूल गोळा केला. हे आपोआप समोर येईल,’ असं सूचक वक्तव्य विखे पाटील यांनी केलं आहे. विखे पाटील यांनी कोणाचंही नाव घेतले नाही. मात्र, त्यांचा रोख महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे असल्याचं दिसून येतं. श्रीरामपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना विखे पाटील यांनी हा आरोप केला. हा मंत्री कोण, असं पत्रकारांनी विचारलं असता ‘जरा सबुरीने घ्या, लवकरच नाव उघड होईल,’ असंही विखे पाटील म्हणाले.

जळगावमध्ये काँग्रेसनंतर आता भाजपही स्वबळावर; सर्वपक्षीय पॅनलचा फज्जा

काही दिवसांपूर्वीच विखे पाटील आणि मंत्री थोरात यांनी एकमेकांवर समन्यायी पाणीवाटप कायद्यावरून टीका केली होती. थोरात यांनी केलेल्या टीकेसंबंधी विचारले असता विखे यांनी त्यांना फार महत्व देत नाही, असे म्हणून उत्तर देणे टाळलं. मात्र, पुढे बोलताना विखे पाटील म्हणाले, ‘महाविकास आघाडीच्या मंत्री व दलालांचे साटेलोटे रोज समोर येत आहे. राज्यातील काही प्रकरणे उघड झाल्यानंतर आता नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री अडकलेला असल्याचं लवकरच समोर येईल. संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आता ते ईडी आणि सीबीआयवर आरोप करू लागतील. आपली पापे झाकण्यासाठी तपास यंत्रणांवर आरोप केले जात आहेत. या संस्थांना बदनाम करून आपली पापे त्यांना झाकता येणार नाहीत,’ असंही विखे पाटील म्हणाले.

दरम्यान, ‘महाविकास आघाडी सरकार भ्रष्टाचारात अडकलं आहे. मोठमोठ्या हॉटेलात आता सरकारच्या दलालांचे अर्थिक व्यवहार होत आहेत. राज्य सरकार करोना प्रतिबंधक लस खरेदी करायला निघाले होते. मात्र, केंद्र सरकारनेच ही लस मोफत पुरवली. त्यामुळे राज्य सरकारचा त्यासाठी तयार केलेला चेक कुठे हरवला हे शोधावे लागेल,’ असा टोलाही विखे पाटील यांनी लगावला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: