दक्षिण भारत जैन सभा : १०० वे त्रैवार्षिक अधिवेशन ,स्वागताध्यक्षपदी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची निवड

जयसिंगपूर,16/10/2021 – दक्षिण भारत जैन सभेचे त्रैवार्षिक शतकमहोत्सवी अधिवेशन जानेवारी 2022 मध्ये सांगली येथे होणार असून या अधिवेशनाच्या स्वागताध्यक्षपदी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची निवड करण्यात आली.
दक्षिण भारत जैन सभेच्या शनिवारी बोरगांव येथे झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये याची घोषणा दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील बोरगांवकर यांनी केली.
जानेवारी 2022 मध्ये सांगली येथे दक्षिण भारत जैन सभेचे शतकमहोत्सवी त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न होत आहे. या अधिवेशनाच्या नियोजना बाबत बोरगांव येथे झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील, केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, दक्षिण भारत जैन सभेचे उपाध्यक्ष दत्ता डोरले हुबळी, जयपाल चिंचवाडे,खजिनदार संजय शेटे, सहखजिनदार पापा पाटील, डॉ आण्णासाहेब चोपडे, महिला महामंत्री भारती चौधरी, विमलताई पाटील,दादासो पाटील चिंचवाडकर, राजेंद्र झेले, बाळासाहेब पाटील, जी.जी.लोकोगोळ,अशोक जैन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस म्हणजे दि.३ एप्रिल १८९९ रोजी तत्कालीन भट्टारक स्वस्तिश्री लक्ष्मीसेन महास्वामीजींच्या अध्यक्षतेखाली आणि तत्कालीन मुंबई प्रांताचे पहिले अर्थमंत्री दिवाण बहाद्दूर श्री.आण्णासाहेब लठ्ठे यांच्यासारख्या कर्तबगार नेतृत्वाच्या दूरदृष्टीने व अथक परिश्रमाने ‘दक्षिण भारत जैन सभा’ उदयास आली. त्या वेळची सामाजिक परिस्थितीच अशी होती की जैन समाजाची एक सामाजिक प्रातिनिधीक संस्था निर्माण करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. संघटनेमुळे समाज निर्भय होतो, सामर्थ्यशाली व स्वाभिमानी होतो.अन्यायाविरूद्ध संघटितपणे लढण्याची शक्ती येते. सभेने सुरूवातीला समाज उन्नतीच्या हेतूने ठिकठिकाणी विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी वसतिगृहे श्राविकाश्रम निर्माण केले. समाज प्रबोधनासाठी ‘प्रगति आणि जिनविजय’ मुखपत्र सुरू केले. समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली. या १२२ वर्षाच्या कालावधीत सभेच्या वसतिगृह आणि शिष्यवृत्तीमुळे हजारो मुले-मुली आज प्रसिद्ध उद्योजक,डॉक्टर, वकिल, इंजिनिअर अशा उच्चपदावर देश-विदेशात कार्यरत आहेत. त्याचबरोबर द.भा.जैन सभेच्या मुशीतूनच ‘लठ्ठे एज्युकेशन सोसायटी’ ही नामांकित शैक्षणिक संस्था निर्माण झाली याचा सभेला सार्थ अभिमान आहे.
दक्षिण भारतातील जैन समाजातील एक अत्यंत क्रियाशील आणि सामर्थ्यशाली संस्था असून याच संस्थेने देशात सर्वप्रथम जैन समाजाला पुन्हा एकदा राष्ट्रीय अल्पसंख्याक दर्जा मिळावा यासाठी सुप्रिम कोर्टात रिट पिटीशन दाखल केले आणि कित्येक वर्षे सर्व प्रकारचा लढा देवून तो हक्क मिळवून घेतला.आज सभेचा कार्यविस्तार सांगली, कोल्हापूर, उत्तर कर्नाटक व मराठवाडा अशा मर्यादित स्वरूपात न राहता तो मुंबई, कोकण व गोवा येथेही विस्तारीत झाला असून या विभागात अनेक सामाजिक उपक्रम सुरू आहेत. सभेचे कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, बेळगाव, हुबळी, औरंगाबाद येथे मुला-मुलींची वसतिगृहे, वीर सेवा दल ही युवकांची संघटना, महिला परिषद, वीर महिला मंडळ, पदवीधर संघटना, बा.भु.पाटील ग्रंथ प्रकाशन मंडळ, कर्मवीर आरोग्य अभियान, मध्यवर्ती ग्रंथालय आदि माध्यमातून कार्यरत आहेत.
संस्कार, शिक्षण आणि आरोग्य या त्रिसूत्रावर भर देवून त्यादृष्टीने सभा जोमाने कार्य करीत आहे. धर्मक्षेत्र, नियतकालिक, शैक्षणिक- आर्थिक संस्था, शिष्यवृत्ती वितरण,गरजू गरीब रूग्णांना औषधोपचारासाठी मदत त्याचबरोबर सभेच्या वतीने समाजातील सेवाभावी कार्यकर्त्यांचा विविध पुरस्काराने गौरव करण्यात येत असतो. अशी अनेकविध विधायक कार्ये अखंडितपणे सातत्याने सुरू आहेत.
स्थापनेपासून दरवर्षी सभेचे अधिवेशने आणि तीन वर्षातून एकदा त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न होत असते. ही परंपरा दक्षिण भारत जैन सभेने आजही जोपासली आहे. सभा आणि तिच्या शाखांचे जमाखर्च- अंदाजपत्रक दरवर्षी समाजा समोर मांडून समाजाकडून आलेल्या सूचना, मार्गदर्शनांची नोंद घेवून त्यानुसार वाटचाल करणारी आणि दैनंदिन कामकाज असणारी ही अखंड देशातील जैन समाजाची एकमेव सामाजिक संस्था आहे. आतापर्यंत अशी ९९ अधिवेशने संपन्न झाली असून १०० वे अधिवेशन संपन्न करण्याचा मान सांगलीला मिळाला असून तिच्या मध्यवर्ती कार्यालय असलेल्या ठिकाणी संपन्न होते आहे. दक्षिण भारत जैन सभेच्या कार्याचे मूल्यमापन, विचारांची देवाण-घेवाण, पुढील कार्यनियोजन व्हावे जुन्या- नव्या कार्यकर्त्यांचे अनुभव, सामाजिक समस्यांचे निरूपण त्याचबरोबर सध्य परिस्थितीत सामाजिक बदलानुसार कार्यप्रणालीतील सुधारणा याबाबत विचार-मंथन अशा अधिवेशनात होत असते.
दक्षिण भारत जैन सभेचा या शंभराव्या अधिवेशनाला म्हणूनच अनन्यसाधारण आणि सभेच्या इतिहासात या अधिवेशनाला ऐतिहासिक महत्त्व आहे. जानेवारी २०२२ मध्ये संपन्न होणारे हे अधिवेशन भव्य-दिव्य स्वरूपात साजरी होणार असून त्यासाठी सभेचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते जोमाने कार्यास लागले आहेत.