पार्थ पवार- सुजय विखेंची अचानक भेट; राजकीय तर्क- वितर्कांना उधाण


हायलाइट्स:

  • राजकारणातील दोन नातूंची विमानात भेट
  • नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांची उड्डाणे
  • राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

अहमदनगरः लोकसभा निवडणुकीच्यावेळी रिंगणात उतरलेल्या राजकारणातील दोन नातूंची मोठी चर्चा झाली होती. यातील एक खासदार झाला तर एकाला पराभवाला सामोरे जावे लागले. असे हे राजकारणातील दोन नातू म्हणजे नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार (parth Pawar) यांची औरंगाबाद-पुणे विमानप्रवासात भेट झाली. या भेटीचे छायाचित्र सोशल मीडियात शेअर करीत डॉ. विखे यांनी याला सीमांपलीकडील मैत्री असे संबोधले. यावर नेटकऱ्यांनी मात्र विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी मैत्रीचे स्वागत केले, काहींनी राजकीय अर्थ काढला तर काहींना दोघांवर आणि त्यांच्या नेत्यांवरही टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार पक्षाच्या कार्यक्रमासाठी औरंगाबादला आले होते. तर ज्येष्ठ नेते स्व. बाळासाहेब विखे पाटील यांचे नातू आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय हेही औरंगाबादला गेलेले होते. तेथून दोघेही विमानाने मुंबईला गेले. विमानात शेजारी बसून त्यांनी प्रवास केला. यावेळी दोघांत नेमकी काय चर्चा झाली, हे त्या दोघांनाच ठावूक. प्रवासात आणि प्रवास संपल्यानंतर दोघांनी एकत्र छायाचित्र काढले. हे छायाचित्र डॉ. विखे यांनी सोशल मीडियात शेअर करून सीमांपलीकडील मैत्री असल्याचे म्हटले.

यावरून नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली. काहींनी याचा राजकीय अर्थ काढून दोघांनाही पक्ष बदलणार काय? अशी विचारणा केली. काहींनी या मैत्रीचे कौतूक केले. अनेकांनी मात्र कडाडून टीका केली आहे. गरीब वडिलांची मुले अशा उपरोधिक प्रतिक्रियाही आल्या असून सगळे राजकारणी आतून एक असून शेतकरी आणि जनतेची फसवणूक सुरू असल्याचेही अनेकांनी म्हटले आहे.

ही भेट योगायोगाने झालेली असली, तरी त्याचे छायाचित्र डॉ. विखे यांनी शेअर केल्याने चर्चा सुरू झाली. विखे-पवार यांच्यात राजकीय वितुष्ट आहेच. लोकसभा निवडणुकीपासून ते आणखी वाढत गेले. या निवडणुकीत डॉ. विखेंचा विजय आणि पार्थ यांचा पराभव राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या जिव्हारी लागला. मात्र, त्यानंतर काही काळातच पार्थ यांची भाजपशी संबंधित लोकांची मैत्री चर्चेत आली होती. त्यांचे काही ट्विटही यासाठी चर्चेत आले होते. त्याची एवढी चर्चा झाली होती की, शेवटी स्वत: पवार यांनी याची दखल घेत समजुतीच्या गोष्टी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर या दोघांची भेट आणि त्याचे डॉ. विखे यांनी छायाचित्र शेअर करणे, यामुळे चर्चेला तोंड फुटले. पार्थ पवार यांनी मात्र या भेटीबद्दल काहीही भाष्य केल्याचे दिसून येत नाही. लोकसभा निवडणुकीच्या आधी सध्याचे कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रवरानगरला भेट दिली होती. त्यावेळीही डॉ. विखे यांनी भेटीचे छायाचित्र असेच शेअर केले होते. त्यावेळीही अशाच चर्चा रंगल्या. पवार-विखे यांच्यातील राजकीय वैर तिसरी पिढी संपविणार, अशीही चर्चा झाली होती. प्रत्यक्षात मात्र हे वैर कायम राहिले. पुढे डॉ. विखे खासदार आणि रोहित आमदार झाले. मात्र, त्यांच्या या मैत्रीची चुणूक पुन्हा पहायला मिळत नाही.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: