Sharad Pawar: महाराष्ट्रात पुढचं सरकार कुणाचं असणार?; शरद पवार यांनी केलं मोठं विधान


हायलाइट्स:

  • मी पुन्हा येणार म्हणणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही.
  • राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे.
  • शरद पवार यांनी पुढच्या सरकारचंही केलं भाकीत.

पिंपरी: ‘काहींनी मी पुन्हा येणार, अशा घोषणा दिल्या मात्र, त्यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही. आता राज्यातील सरकार स्थिर आहे. त्यामुळे तपास यंत्रणांचा गैरवापर करत सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुम्ही दबावतंत्राचा वापर करा, छापे टाका. तुम्ही काहीही करू शकता. तरीही आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल आणि राज्यातील पुढचं सरकारही महाविकास आघाडीचंच असेल’, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. ( Sharad Pawar Slams Devendra Fadnavis )

वाचा: महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न!; पवारांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर असताना पवार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. या शहरावरील प्रेम कायम असल्याचे नमूद करून पवार म्हणाले, ‘देशात सध्याची परिस्थिती चांगली नाही. सामान्य लोकांचे प्रश्न वाढत आहेत. परंतु, हाती सत्ता असलेल्या केंद्र सरकारला आस्था नाही. पेट्रोल, डिझेलच्या किंमती रोजच वाढत आहेत. काल आणि आजही वाढल्या. यापूर्वी असे कधी घडले नव्हते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमतीचा परिणाम असल्याचे सरकार सांगते. पण, सहा महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमती खाली आल्या असताना पेट्रोल स्वस्त केलं नाही. जगभरातील पेट्रोल निर्मिती करणाऱ्या देशांमध्ये दरांमध्ये घसरण होत असताना आपल्या देशात मात्र किमती वाढतच राहिल्या.’ तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्र सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोलच्या किंमती वाढल्या, म्हणून आम्हाला किंमती वाढवायचा निर्णय घ्यावा लागला. त्यानंतर सलग दहा दिवस संसदेचे कामकाज चालू न देण्याची भूमिका भाजपने घेतली होती. मात्र, आज त्यांचा पक्ष सत्तेवर असताना रोज किंमती वाढवल्या जात आहेत. नागरिकांना महागाईच्या संकटात ढकलण्याचे काम होत आहे. ही बाब योग्य नाही, असे पवार यांनी सांगितले.

वाचा: तर राजकारणातून बाहेर पडलो असतो!; उद्धव ठाकरे फडणवीसांना काय म्हणाले?

केंद्र सरकारकडून यंत्रणेचा पदोपदी गैरवापर केला जात असल्याचा पुनरुच्चार करून पवार म्हणाले, ‘खासदार भावना गवळी यांच्या संस्थांवर छापे टाकले. मंत्र्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला. विधीमंडळात भाजपचे २० वर्षे नेतृत्व केलेल्या एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडताच त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्यांच्या विरोधात खटले सुरु झाले. पत्नीलाही समन्स काढले. अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरी आयकर विभागाने छापे टाकले. पाच दिवस अधिकारी घरी चौकशी करत होते. हे गंभीर आहे. चौकशी करावी त्याला हरकत नाही. पण, चौकशी झाल्यानंतर अधिकाऱ्यांना घरीच थांबायला सांगितले. हे चुकीचे आहे. असा पाहुणचार योग्य नाही.’

या प्रकारच्या छापेमारीतून काही निष्पन्न होणार नाही असा दावा करून पवार म्हणाले, किती पैसे सापडले? यावर छापा टाकणाऱ्या अधिकाऱ्यांनी किंवा त्यांच्या प्रवक्त्यांनी भाष्य केल्यास समजू शकते. परंतु, भाजपचे नेते पुढे येऊन माहिती देतात. खुलासा करतात. याचा अर्थ आकसाने कारवाई केल्याचे निदर्शनास येते. माजी मुख्यमंत्री आणि माजी खासदार बोलतात आणि आरोप करतात. त्यानंतर यंत्रणा तातडीने कारवाई करते. केंद्र सरकारने याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. अलीकडे एखाद्या घटनेचे धागेदोरे महाराष्ट्रात दाखवून यंत्रणेचा गैरवापर करून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत.’

वाचा: उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, मी सक्ती केली!; पवार फडणवीसांना म्हणाले…

फडणवीस अस्वस्थ

विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्तेवर `मी पुन्हा येईन` असे वारंवार सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना सत्तेवर येता आले नाही. त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. सत्ता नसल्याने त्यांचा पक्ष, त्यांची अस्वस्थता वाढली आहे. फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री होते. या पदावर काम केलेल्या लोकांनी टीका-टिप्पणी करताना काही पथ्ये पाळावी लागतात. परंतु, ते काहीही टिप्पणी करू लागले आहेत. अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते असे ते सांगत आहेत. यातून त्यांची मानसिकते दिसून येते, असे शरद पवार यांनी सांगितले.

…तर योग्य तो आदेश देईन

राज्यात एकत्रित सत्तेत असलेले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महापालिकेच्या आगामी निवडणुका एकत्र लढणार की स्वतंत्र या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, `यासंदर्भात त्या-त्या जिल्ह्यातील नेते एकत्रित निर्णय घेतील किंवा राज्यातील नेत्यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय घेतील. त्यांनी मला विचारल्यावर योग्य तो आदेश देईन’

वाचा: ‘विखे सध्या निवांत झोप येणाऱ्या पक्षामध्ये गेलेत, त्यामुळेच…’Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: