Nawab Malik: अर्धे कशाला, पूर्ण मंत्रिमंडळ टाका ना तुरुंगात!; ‘या’ मंत्र्याचे फडणवीसांना आव्हान


हायलाइट्स:

  • ईडी, सीबीआयच्या वापरावरून सत्ताधारी-विरोधकांत जुंपली.
  • मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले आव्हान.
  • अर्धे कशाला पूर्ण मंत्रिमंडळ तुरुंगात टाका, आम्ही घाबरत नाही!

मुंबई: ‘अर्धे कशाला पूर्ण मंत्रिमंडळ टाका ना तुरुंगात…आम्ही कुणाला घाबरणार नाही’, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. ( Nawab Malik On Devendra Fadnavis )

वाचा: उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, मी सक्ती केली!; पवार फडणवीसांना म्हणाले…

ईडी, सीबीआय यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणात केला होता. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले व केंद्रातील सरकारने यंत्रणांचा गैरवापर केला असता तर महाराष्ट्रातील अर्धे मंत्रिमंडळ आज तुरुंगात गेले असते, असे वक्तव्य केले. त्याचा मंत्री नवाब मलिक यांनी खरपूस समाचार घेतला. सत्तेचा गैरवापर करायचा असेल तर तुम्ही कितीही लोकांना तुरुंगात टाकू शकता परंतु, आम्ही घाबरणार नाही, असा इशारा मलिक यांनी दिला. भ्रष्टाचाराचे आरोप करत असताना त्यांनी भान ठेवून आरोप केले पाहिजेत, असे सांगतानाच ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हज को’ असा टोलाही नवाब मलिक यांनी फडणवीसांना लगावला. बरेचसे उंदीर आम्ही काही दिवसांतच बाहेर काढू, असा सूचक इशाराही नवाब मलिक यांनी दिला.

वाचा: महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न!; पवारांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

काय म्हणाले होते फडणवीस?

ईडी, सीबीआयला आम्ही येथे आणले नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानेच त्यांची चौकशी सुरू आहे आणि याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे ज्या सरकारचं नेतृत्व करत आहेत ते महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. खंडणी वसुली हा या सरकारचा एकमेव अजेंडा आहे. शेतकऱ्याला मदत करायला या सरकारकडे पैसे नाहीत मात्र भ्रष्टाचार राजरोसपणे सुरू आहे. आयकर विभागाच्या धाडींमधून धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत. राज्यात प्रचंड प्रमाणात दलाली चालली आहे. काही मंत्र्यांकडे तर वसुलीचे सॉफ्टवेअर आढळले आहे. त्या माध्यमातून कोणाकडून किती वसुली करायची आहे याचे अ‍ॅलर्ट घेतले जातात. हेच चालणार असेल तर या महाराष्ट्रात ईडी, सीबीआय येणारच, असे फडणवीस म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तपास यंत्रणांच्या वापराच्या पूर्णपणे विरोधात आहेत. यंत्रणांचा गैरवापर ते कधीही करू देत नाहीत. यंत्रणांच्या कामाच्या मध्येही ते येत नाहीत. राजकीय वापरही कधी केला नाही. वापर केला असता तर तुमचे अर्धे मंत्रिमंडळ आज जेलमध्ये असते, असे फडणवीस यांनी सांगितले. आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे लोक आहोत. त्यामुळे मागच्या काळात काँग्रेस आणि त्याच्या सोबतच्या पक्षांनी यंत्रणांचा दुरुपयोग केला तसा दुरुपयोग आम्ही कधीच करणार नाही. आमचे नेतेही करणार नाहीत पण एक गोष्ट स्पष्ट आहे, भ्रष्टाचार खणून काढल्याशिवाय मोदी स्वस्थ बसणार नाहीत. त्यामुळेच जे भ्रष्टाचारी असतील त्यांनी घाबरायचं आणि जे भ्रष्टाचारी नसतील त्यांनी घाबरण्याचे कारण नाही, असे नमूद करत फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले होते.

वाचा: ‘विखे सध्या निवांत झोप येणाऱ्या पक्षामध्ये गेलेत, त्यामुळेच…’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: