टीम इंडिया ४ आयसीसी स्पर्धांमध्ये सहभागी होणार
द्रविड रवी शास्त्रीची जागा घेईल, तर पारस भरत अरुणची जागा घेणार आहे. क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांच्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. द्रविडच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ४ आयसीसी स्पर्धांमध्ये सहभाग घेणार आहे. पुढील वर्षी टी-२० विश्वचषक आणि २०२३ मधील ५० षटकांचा विश्वचषक आहे. याशिवाय, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामनाही २०२३ मध्ये होणार आहे. बीसीसीआयला आशा आहे की, द्रविडच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडिया आयसीसी स्पर्धा जिंकण्याचा दुष्काळ संपवेल.
२०१३ पासून सुरू असलेला वर्ल्डकप विजयाचा दुष्काळ द्रविड संपवणार?
टीम इंडियाने २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. त्यानंतर संघाला आयसीसीची एकही स्पर्धा जिंकता आली नाही. विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत २ आयसीसी स्पर्धा गमावल्या आहेत. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१ च्या जेतेपदाच्या सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाचा पराभव केला होता, तर एकदिवसीय विश्वचषक २०१९ च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडूनही त्यांचा पराभव झाला होता. याशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ मध्ये विराटच्या नेतृत्वाखालील संघ पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात पराभूत झाला होता, पण त्यावेळी संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे होते.