गेल्या वर्षीच्या खराब कामगिरीमुळे धोनी आणि त्याच्या चेन्नई सुपर किंग्जला टीकेचा सामना करावा लागला होता. पण यावर्षी जोरदार पुनरागमन करत आयपीएल २०२१ चे जेतेपद जिंकले आहे. चेन्नईचे हे चौथे आयपीएल जेतेपद आहे. सध्या जगभरातून धोनीवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. यामध्ये आता भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचाही समावेश आहे. चेन्नईने अंतिम सामन्यात कोलकाताला २७ धावांनी पराभूत करून जेतेपद पटकावले, तेव्हा गावस्कर धोनीचे कौतुक केल्याशिवाय राहू शकले नाहीत. पहिल्यापासूनच गावस्कर हे धोनीचे फॅन राहिले आहेत. त्यामुळे आयपीएल जेतेपदानंतर गावस्कर यांनी धोनीचे अभिनंदन करत काही गोष्टी सांगितल्या आहेत.
चेन्नईने आयपीएल जिंकल्यानंतर स्टार स्पोर्ट्सवर बोलताना गावस्कर म्हणाले की, “धोनी खूप प्रभावी व्यक्ती आहे, कारण त्याने खेळाडूंवर विश्वास ठेवला आहे. खेळाडूची क्षमता काय आहे, हे तुम्हाला माहिती आहे. असे पण दिवस येतात, जेव्हा खेळाडू चांगली कामगिरी करत नाही. एक महान क्षेत्ररक्षकही झेल सोडू शकतो आणि ढिसाळ क्षेत्ररक्षण करू शकतो. एखादा फलंदाज फुलटॉस चेंडूवरही बाद होऊ शकतो. तसेच गोलंदाजही कधीकधी खराब गोलंदाजी करू शकतो, ज्यावर त्याला षटकार बसू शकतात, पण कर्णधार म्हणून जेव्हा तुम्हाला एखाद्या खेळाडूची क्षमता माहीत असते, तेव्हा तुम्ही त्याला वाईट दिवशी काहीही बोलत नाही. धोनी या कामात हुशार आहे.”