जेव्हा केकेआरच्या ७ विकेट पडल्या होत्या, तेव्हा जखमी अवस्थेतील त्रिपाठी धैर्य दाखवत फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पायाला दुखापत झाल्यानंतरही त्याने अंतिम सामन्यात खेळपट्टीवर येऊन फलंदाजी केली. त्यावेळी चेन्नईचा कर्णधार धोनीने त्रिपाठीच्या या धाडसाला सलाम केला. आणि त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याचा धीर वाढवला. धोनीने राहुलच्या पाठीवर थाप मारली. धोनीच्या या कृतीने चाहत्यांची मने जिंकली. सोशल मीडियावर धोनीचं कौतुक होत आहे.
चेन्नईचा सलामीवीर प्रतिभावान फलंदाज ऋतुराज गायकवाड ऑरेंज कॅप जिंकण्यात यशस्वी झाला. ऋतुराज यावर्षी आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू ठरला आहे. सामन्यानंतर गायकवाड म्हणाला की, आमचा संघ चॅम्पियन बनल्याने त्याच्या कर्तृत्वाचे महत्त्व वाढले आहे. जेतेपद आणि ऑरेंज कॅपही जिंकली असल्याने ही भावना शब्दात मांडणे कठीण आहे, पण गेल्या वर्षीच्या हंगामानंतर याच ठिकाणी स्पर्धा जिंकणे, ही एक मोठी भावना आहे.
ऋतुराजने स्पर्धेत ६३५ धावा केल्या, तर त्याचा संघ सहकारी फाफ डु प्लेसिस ६३३ धावांसह दुसऱ्या स्थानावर राहिला. अंतिम फेरीत चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सचा २७ धावांनी पराभव केला. आयपीएलच्या अंतिम सामन्यात चेन्नईने कोलकाताला २७ धावांनी पराभूत करत चौथ्यांदा जेतेपद पटकावले. फाफ डु प्लेसिसला सामनावीराचा किताब देण्यात आला. फाफने ८६ धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली.